Lata Mangeshkar Last Rites (संग्रहित संपादित प्रतिमा)

आपल्या आवाजाने गेली 6 दशके देशातील प्रत्येकाच्या मनावर राज्य करणाऱ्या महान गायिका, भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज सकाळी (6 फेब्रुवारी 2022) निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. संध्याकाळी साधारण सव्वासात वाजता त्यांच्यावर मुंबईच्या दादर परिसरातील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल, राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री, राज ठाकरे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस, पियुष गोयल असे नेते, तसेच सचिन तेंडूलकर, शाहरुख खान, पद्मनी कोल्हापुरे, श्रद्धा कपूर, जावेद अख्तर असे अनेक सेलेब्ज उपस्थित होते.

लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी त्यांना मानवंदना दिल्यानंतर त्यांचे पार्थिव शिवाजी पार्ककडे रवाना झाले. पांढऱ्या फुलांनी सजवलेल्या सेनेच्या ट्रकमधून त्यांचा अंतिम प्रवास सुरु झाला. साधारण साडेपाच वाजता त्यांचे पार्थिव शिवतीर्थावर पोहोचले. याठिकाणी त्यांचे पार्थिव चाहत्यांसाठी दर्शनासाठी ठेवले होते. पंतप्रधानांचे शिवाजीपार्कवर आगमन झाल्यानंतर त्यांनी दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी लता दीदींना श्रद्धांजली अर्पण केली व त्यानंतर अंत्यविधींना सुरुवात झाली. त्यानंतर सेनेच्या तीनही दलांच्या अधिकाऱ्यांकडून दीदींना मानवंदना देण्यात आली आणि सव्वासात वाजता त्यांना मंत्रोच्चारामध्ये मुखाग्नी देण्यात आला. अशा प्रकारे दिवसाच्या सूर्याच्या अस्तासोबत एका मोठ्या युगाचा अस्त झाला.

जानेवारीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर लता मंगेशकर यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना न्यूमोनिया झाला. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, परंतु त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर व्हेंटिलेटरचा सपोर्ट काढूनही घेण्यात आला. मात्र 5 फेब्रुवारीला त्यांची प्रकृती बिघडू लागली आणि त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. अखेर 6 फेब्रुवारीला गानकोकिळेने अखेरचा श्वास घेतला. (हेही वाचा: 'मेरी आवाज ही पेहचान है...'; जाणून घ्या लता मंगेशकर यांना मिळालेले काही महत्वाचे पुरस्कार)

दरम्यान, जगभरात 'नाइटिंगेल ऑफ इंडिया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांनी जवळपास पाच दशके हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या गायनाचा ठसा उमटवला. लता दीदी यांनी 1942 मध्ये वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आतापर्यंत अनेक भारतीय भाषांमध्ये 50 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. महल या चित्रपटातील ‘आएगा आनेवाला...’ या गाण्यामुळे लतादीदी रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.