सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाने बॉलिवूड विश्वाला अजून एक जबर धक्का बसला आहे. सुशांत सिंह राजपूत याने आज मुंबईतील वांद्रे (Bandra) येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. यामुळे बॉलिवूडने एक उमदा, तरुण अभिनेता गमावला आहे. एम.एस.धोनीच्या बायोपिकनंतर सुशांत सिंह क्रिकेट विश्वातही चांगलाच प्रसिद्ध झाला होता. सुशांत सिंह राजपूत याच्या धक्कादायक निधनानंतर बॉलिवूड, क्रीडा, राजयकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. 'MS Dhoni The Untold Story' या सिनेमासाठी सुशांत याला भारतीय क्रिकेट संघाचे माजी विकेटकिपर किरण मोरे (Kiran More) यांनी ट्रेनिंग दिली होती. त्यामुळे सुशांत सिंह याला ट्रेनिंग देणारे किरण मोरे यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"वैयक्तिरित्या हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. कारण हा तर सुशांत सिंह राजपूत ज्याला मी MS Dhoni सिनेमासाठी ट्रेन केले होते. मला ठाऊक नाही मी आणि सुशांतला ओळखत असलेल्या प्रत्येकजण या धक्कातून कसे सावरतील? माझ्या मित्रा तू खूप लवकर गेलास," अशा शब्दांत किरण मोरे यांनी ट्विटद्वारे आपले दुःख व्यक्त केले आहे. (सुशांत सिंह राजपूत याच्या निधनामुळे क्रीडाविश्वालाही जबर धक्का; विरेंद्र सेहवाग, सायना नेहवाल, शिखर धवन यांच्यासह क्रीडापटूंनी व्यक्त केल्या भावना)
Kiran More Tweet:
It is a shocking moment for me personally, @itsSSR was someone whom I trained for the role as @msdhoni. I don't know how I or anyone who knows him will be able to recover from this shock, gone too soon my friend #SushantSinghRajput #RIPSushant
— Kiran More (@JockMore) June 14, 2020
सुशांत सिंह राजपूत याच्या घरातील तपासानंतर कोणतीही सुसाईट नोट सापडलेली नाही. दरम्यान सुशांत सिंह डिप्रेशनमधून जात असल्याचे बोलले जात आहे. आपल्या आईबद्दल केलेली इंस्टा पोस्ट त्याची अखेरची ठरली. दरम्यान सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.