बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी जयललिता यांच्यावरील बायोपिकमुळे बरीच चर्चेत आहे. या बायोपिकसाठी कंगना खूप मेहनत घेत आहे. कंगनाने पडद्यावर जयललिता होण्यासाठी तमिळ भाषा शिकण्यासही सुरुवात केली आहे. अलीकडेच कंगनाने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होती की, आजकाल दक्षिणेतील लोक तिला अक्का आणि अम्मा म्हणतात. यासोबतच कंगना रनौतचे दक्षिणेसोबतचे संबंध हळू हळू प्रस्थापित होत आहेत. काही दिवसांपूर्वीच कंगना दक्षिणच्या सद्गुरू जग्गी वासुदेव यांची संस्था ईशा फाउंडेशनच्या ‘कावेरी कॉलिंग’ (Cauvery Calling Campaign) मोहिमेशीही जोडली गेली आहे.
या मोहिमेत सहभागी होऊन कंगना पर्यावरण वाचविण्याचे काम करीत आहे. या मोहिमेसाठी मदत म्हणून कंगनाने तब्बल 42 लाख रुपये दिले आहेत. यासह एक लाख झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याअंतर्गत कंगना लोकांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन करीत आहे. या मोहिमेशी संबंधित एका कार्यक्रमादरम्यान कंगनाने पर्यावरणाविषयी बोलताना सांगितले की, फॅशन उद्योग हा पर्यावरणाचा सर्वात मोठा धोका आहे. कारण फॅशन उद्योगात, सेलेब्ज लेदर शूज-चप्पल आणि महागडी जॅकेट्स आणि पर्स वापरतात. हे सर्व पर्यावरणासाठी धोकादायक आहे.
कंगना रनौतच्या इन्स्टाग्राम फॅन क्लबवरुन ही बाब समोर आली आहे. ईशा फाउंडेशन कावेरी नदी वाचविण्यासाठी 'कावेरी कॉलिंग' नावाची मोहीम राबवित आहे. ज्यासाठी कंगनाने 42 लाख रुपयांची मदत केली आहे. याआधी अनेक सेल्ब्जनी सामजिक कार्यांमध्ये आपला हातभार लावला आहे. अमिताभ बच्चन, सलमान खान, अमीर खान, रितेश देशमुख, लता मंगेशकर असे अनेक कलाकार आपल्या परीने मदत करता असतात, मात्र आज पहिल्यांदाच कोणत्या अभिनेत्रीने इतकी मोठी रक्कम सामाजिक कार्यासाठी मदत म्हणून दिली आहे.