साऊथचा सुपरस्टार सुर्याचा (Surya) चित्रपट 'जय भीम' (Jai Bhim) पुन्हा एकदा वादात सापडला आहे. दरम्यान, व्ही कुलंजियप्पन नावाच्या एका व्यक्तीने चित्रपटाचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल (TJ Gnanavel) आणि सुर्या 2डी एंटरटेनमेंट यांच्या विरोधात वचन दिलेली भरपाई न देता चित्रपटासाठी आपली जीवनकथा वापरल्याचा आरोप करत कॉपीराइट कायद्याचा (Copyright) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चेन्नईतील शास्त्री नगर पोलिस ठाण्यात दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन हाऊसविरुद्ध कॉपीराइट कायद्याच्या कलम 63 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे म्हटले जाते की 2019 मध्ये ज्ञानवेलने शूटिंगपूर्वी कुलंजियप्पनची भेट घेतली होती आणि त्याच्या जीवनकथेसाठी रॉयल्टी म्हणून 50 लाख रुपये देण्याचे वचन दिले होते. यासोबतच त्याला चित्रपटाच्या नफ्यातही वाटा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता कुलंजियप्पन यांना आश्वासनाप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या बातम्या येत आहेत.
कुलंजियप्पन यांची परवानगी घेण्यात आली नाही
एका दक्षिण वाहिनीशी बोलताना कुलंजियप्पनच्या वकिलाने सांगितले की, 'कॉपीराइट कायद्यानुसार निर्मात्यांनी माझ्या क्लायंटकडून लेखी परवानगी घ्यायला हवी होती. मात्र, अद्याप अशी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्या क्लायंटच्या जीवनकथेवर आधारित चित्रपट बनवणे आणि त्याच्या परवानगीशिवाय पैसे कमवणे हा गुन्हा आहे.
वन्नियार समाजाबाबतही झाला होता वाद
तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की मद्रास उच्च न्यायालयाने सूर्या, ज्योतिका आणि टीजे ज्ञानवेल यांच्यावरील खटला फेटाळला आहे. त्या प्रकरणानुसार, असा दावा करण्यात आला होता की, या चित्रपटात वन्नियार समाजाचे चित्रण अतिशय वाईट पद्धतीने करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दोन आठवड्यांतच चित्रपट निर्माते पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. (हे देखील वाचा: Pathaan: 'पठाण' चित्रपटातील जॉन अब्राहमचा फर्स्ट लूक शेअर, 'या' दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित)
चित्रपटात सुर्या वकिलाच्या भूमिकेत
या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश के चंद्रू यांच्यापासून प्रेरित असलेल्या 'जय भीम'मध्ये सुर्या एका कार्यकर्त्या-वकिलाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात न्यायाधीश चंद्रू यांनी उच्च न्यायालयात वकील असताना लढलेल्या केसचे चित्रण करण्यात आले आहे. गेल्या वर्षी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर या चित्रपटाचा प्रीमियर झाला आणि चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून खूप प्रेम आणि प्रशंसा मिळाली.