15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक देशवासियासाठी अत्यंत खास आहे. नवे सिनेमे प्रदर्शित करुन या राष्ट्रीय सणाचा आनंद गेली अनेक वर्ष सिनेमाघरातही साजरा होत आहे. मात्र यंदा कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे सिनेमे OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय अनेक निर्मात्यांनी घेतला आहे. 14 ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्मवर अनेक सिनेमे आणि वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर पाहुया यंदा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत प्रेक्षकांच्या भेटीला येणारे सिनेमे आणि वेबसिरीज...
विद्युत जामवाल यांचा खुदा हाफिज (Khuda Haafiz) सिनेमा Disney+ Hotstar वर 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा म्हणजे अॅक्शन आणि सस्पेंसचे पॅकेज आहे. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली असून या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. हा सिनेमा फरुख कबीर यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात विद्युत जामवाल सह अनु कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
दरम्यान कुणार खेमू याची अभय 2 (Abhay 2) ही वेबसिरीज 14 ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. बहुप्रतिक्षित अशी ही वेबसिरीज Zee5 वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या थ्रिलर वेबसिरीजचे दिग्दर्शन केन घोष यांनी केले आहे.
डेंजरस (Dangerous) या सिनेमातून बिपाशा बसू प्रदीर्घ काळानंतर सिनेमात परतली आहे. हा सिनेमा देखील आज प्रदर्शित होत आहे. या सिनेमात बिपाशा पती करण सिंह ग्रोवर सह झळकणार आहे. डेंजरस हा थ्रिलर सिनेमा असून भूषण पटेल यांनी दिग्दर्शित केला आहे. MX Player तुम्ही या सिनेमाचा आनंद घेऊ शकता.