प्रसिद्ध बॉलिवूड कोरियोग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शिका फराह खानला (Farah Khan) कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. फराहने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. फराह खानने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, असे असूनही ती पॉझिटिव्ह झाली आहे. फराह खानने तिच्या संपर्कात आलेल्या लोकांना काळजी व खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. आता फराह करत असलेल्या कॉमेडी शोच्या आगामी भागामध्ये तिच्याऐवजी गायक मिका सिंग जज म्हणून दिसणार आहे. तूर्तास फराह संसर्गामुळे काही काळ शूटिंगपासून दूर राहील.
फराह खानने तिच्या इन्स्टा स्टोरी पोस्टवर आपण कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती शेअर केली आहे. तिने लिहिले आहे की, ‘हे घडले याचे मला खूप आश्चर्य वाटते.. कदाचित मी माझा काळा तिट लावला नसेल. कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन आणि दोन्ही डोस घेतलेल्या लोकांसोबत काम करूनही मी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना त्यांची चाचणी करून घेण्याचे सूचित केले आहे.’
फराह अलीकडेच झी टीव्हीवरील आगामी कॉमेडी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय इतर काही रिअॅलिटी शोच्या शूटिंगमध्येही फराह उपस्थित होती. काही दिवसांपूर्वी फराह तिची मैत्रीण शिल्पा शेट्टीचा डान्स रिअॅलिटी शो 'सुपर डान्सर 4' च्या सेटवर शूट करताना दिसली होती. याशिवाय, तिने अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या क्विझ शोच्या सीझन 13 च्या एका विशेष भागाचे चित्रीकरण केले आहे. (हेही वाचा: अभिनेत्री पायल रोहतगी विरोधात पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल)
दरम्यान, फराह या आठवड्यात अरबाज खानचा शो 'पिंच' मध्ये दिसणार आहे, या शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. फराह खानने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि लसीकरणानंतर सुमारे एक महिन्यापूर्वी तिने कॉमेडी शोचे शूटिंग सुरू केले आहे.