Rituparna Sengupta (PC - Instagram)

Rituparna Sengupta Summoned By ED: बंगाली अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ताच्या (Rituparna Sengupta) अडचणीत वाढ झाली आहे. गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अभिनेत्रीला समन्स बजावले. पश्चिम बंगालमधील कथित 'रेशन वितरण घोटाळ्याच्या' (Ration Distribution Scam Case) तपासासंदर्भात अभिनेत्रीला 5 जून रोजी ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, बंगाली अभिनेत्रीला कोलकाता येथील ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर हजर व्हावे लागेल. अभिनेत्री सध्या वैयक्तिक कारणास्तव अमेरिकेत असल्याचे बोलले जात आहे.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन घोटाळ्यातून मिळालेला पैसा बंगाली फिल्म इंडस्ट्रीमध्ये वापरण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सेनगुप्ता यांना निजाम पॅलेस येथील कार्यालयात त्यांच्या चित्रपटांच्या खात्याच्या तपशीलासह येण्यास सांगितले आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्याला 5 जूनला सकाळी आमच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागेल. (हेही वाचा -Maharaja Movie: विजय सेतुपती स्टारर 'महाराजा' चित्रपटाचा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित, अभिनेत्याने इंटेक्स लूक शेअर करत दिला 'हा' इशारा)

रितुपर्णा सेनगुप्ता सध्या देशात नसून ती अमेरिकेत आहे. अभिनेत्रीला ई-मेलद्वारे समन्स पाठवण्यात आले होते. या प्रकरणावर अद्याप अभिनेत्रीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. कुटुंबाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, अभिनेत्री काही वैयक्तिक कारणांमुळे अमेरिकेत आहे. दरम्यान, रेशन घोटाळ्याप्रकरणी माजी अन्न मंत्री ज्योतिप्रिया मल्लिक, रेशन व्यापारी बाकीबुक रहमान आणि बनगाव नगरपालिकेचे माजी अध्यक्ष शंकर आध्ये यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे. सध्या ईडी या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.