ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदाचा राजीनामा बुधवारी दिला. विविध कामांतील व्यग्रतेच्या कारणावरुन आपण हा राजीनामा देत असल्याचे खेर यांनी म्हटले आहे. ऑक्टोंबर २०१७मध्ये त्यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. एफटीआयआयचे अत्यंत वादग्रस्त ठरलेले अध्यक्ष गजेंद्र चौहाण यांच्याकडून त्यांनी संस्थ्येच्या अध्यक्षपदाची पुढील सूत्रे हाती घेतली होती.
वर्तमान स्थितीबाबत बोलायचे तर, अनुपम खेर हे सध्या माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या जीवनावर आधारीत येत असलेल्या 'द एक्सिडेंटल प्राईम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, सध्या ते चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेत व्यग्र आहेत. या चित्रपटात अनुपम खेर हे मनमोहन सिंह यांची चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.
एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा एकूण तीन वर्षांचा असतो. दरम्यान, अनुपम खेर यांनी एक वर्षातच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एफटीआयआय ही संस्था केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या कक्षेत येते. (हेही वाचा, कॅन्सरशी झुंजत असलेला इरफान खान भारतात परतणार; 'या' सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला)
Anupam Kher has resigned from the post of Film and Television Institute of India (FTII) Chairman citing 'busy schedule'. pic.twitter.com/aY0HA0TsFa
— ANI (@ANI) October 31, 2018
अनुपम खेर हे ज्येष्ठ आणि तितकेच लोकप्रिय अभिनेते आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे ५०० हून अधिक चित्रपट आणि नाटकांमधून काम केले आहे. त्यांनी काही आंतरराष्ट्रीय सिनेमेही केले आहेत. त्यांचा आंतरराष्ट्रीय सिनेमा 'बेंड इट लाईक बेकहम'ला २००२मध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकीत करण्यात आले होते. त्यांना अभिनय क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिल्मफेयर पुरस्काराने ८ वेळा सन्मानित करण्यात आले आहे. ज्यात ५ उत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कारांचाही समावेश आहे. अनुपम खेर यांच्याप्रमाणेच अनेक नामवंत अभिनेत्यांनी एफटीआयआयचे अध्यक्षपद सांभाळले आहे. ज्यात शाम बेनेगल, अदूर गोपालकृष्णन, सईद मिर्जा, महेश भट्ट, मृनाल सेन, विनोद खन्ना यांसारख्या वजनदार आणि अनुभवसृद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे.