कॅन्सरशी झुंजत असलेला इरफान खान भारतात परतणार; 'या' सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
इरफान खान (File Photo)

बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कॅन्सरने ग्रस्त असलेला इरफान खान तब्बल सात महिन्यांनंतर भारतात परतणार आहे. काही महिन्यांपूर्वी इरफान खानला Neuroendocrine Tumour या दुर्धर आजाराचे निदान झाले होते. यासाठी तो लंडनमध्ये उपचार घेत होता. आता लवकरच तो भारतात परणार असून हिंदी मीडियम सिनेमाच्या सिक्वलच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. यावरुन इरफानच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे स्पष्ट होते.

येत्या एक दोन दिवसात इरफान खान भारतात परतेल. त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इरफान हिंदी मीडियम 2 च्या शूटिंगचा शुभारंभ करेल. सिनेमाच्या निर्मात्यांनी लंडनमध्ये इरफानची भेट घेवून सिक्वलची कथा ऐकवली. इरफानला देखील कथा भयंकर आवडली आणि त्याने सिनेमासाठी लगेचच होकार दिला.

हिंदी मीडियम 2 ची निर्मिती दिनेश विजनची मॅडॉक फिल्म्स करत आहेत. तर दिग्दर्शनाची धूरा होमी अदजानिया यांच्याकडे आहे. या सिनेमात 10 वर्षानंतरची कथा दाखवण्यात येणार आहे. त्याचबरोबर इरफानचे त्याच्या टीनएज मुलीसोबत असलेले नातेही पाहायला मिळणार आहे.

सिनेमाच्या पहिल्या पार्टमध्ये सबा कमर प्रमुख भूमिकेत होती. पण सिक्वलमध्ये इरफानच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री सबा कमरच्या पदरी पडणार की कोणती नवी अभिनेत्री ही भूमिका साकारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.