Anupam Kher यांचा मोदी सरकारला टोला; म्हणाले- प्रतिमा बनवण्यापेक्षा जीव वाचवणं जास्त गरजेचं
Anupam Kher & PM Modi (Photo Credits: Instagram/Facebook)

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) हे मोदी सरकारचे समर्थक असल्याचे मानले जाते. सोशल मीडियावर अनेकवेळा त्यांनी मोदी सरकारची (Modi Goverment) प्रशंसा केली आहे. परंतु, कोरोना व्हायरस संकटात अनुपम खेर यांनी पहिल्यांदा मोदी सरकारवर टीका केली आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले, "कोरोना संकटाचा सामना करण्यात मोदी सरकार कुठे ना कुठे तरी अपयशी ठरलं आहे. प्रतिमा बनवण्यापेक्षा जीव वाचवणं अधिक महत्त्वाचं आहे, हे त्यांना समजायला हवं."

मुलाखतीत अनुपम खेर यांना नदीत वाहणाऱ्या प्रेतांपासून सरकारची प्रतिमा तयार करण्यापर्यंत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, "अनेक मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर टीका करता येईल. यावेळी सरकारने ते काम करावे ज्यासाठी त्यांना निवडण्यात आले आहे. नदीत वाहणारी प्रेत पाहून फरक न पडणारी एखादी असंवेदनशील व्यक्ती असावी. परंतु, दुसऱ्या राजकीय पक्षांनी आपल्या फायद्यासाठी याचा वापर करु नये."

पुढे ते म्हणाले की, "सध्या आपण सर्वजण अनेक समस्या, दु:ख, राग, निराशा अशा गोष्टींचा सामना करतोय. संपूर्ण जग या समस्येचा सामना करत आहे. अनेक लोक म्हणातात मी खूप आशावादी आहे. परंतु, माझ्याकडे त्याशिवाय पर्याय नाही,"

अनुपम खेर भाजप सरकारचे समर्थक असून त्यांची पत्नी किरण खेर या भाजपच्या खासदार आहेत. परंतु, मोदी सरकारवर टीका करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. दरम्यान, अनुपम खेर हे केवळ सरकारवर टीका करत नाहीत तर कोरोना लढ्यात ते आपले योगदानही देत आहेत. हील इंडियाच्या माध्यमातून ते व्हेंटीलेटर आणि ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत.