Nora Fatehi (Photo Credits: Instagram)

मास्टरमाईंड सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandrashekhar) निगडीत 200 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील सहआरोपी जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) याआधी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता यामध्ये आणखी थोडी भर पडली आहे. अभिनेत्री नोरा फतेहीने (Nora Fatehi) जॅकलिनवर मोठा आरोप केला आहे. नोरा फतेही हिने सोमवारी को-स्टार जॅकलिन फर्नांडिस आणि 15 मीडिया हाऊसच्या विरोधात त्यांच्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल मानहानीचा खटला दाखल केला.

नोरा फतेहीने दावा केला की, तिचे प्रतिस्पर्धी कलाकार आणि मीडिया संस्था 'एकमेकांच्या संगनमताने तिच्याविरुद्ध काम करत आहेत'. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोराने जॅकलीनवर 200 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. नोराने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात जॅकलिनविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. नोरा फतेहीने आरोप केला आहे की, गँगस्टर सुकेश चंद्रशेखरचा समावेश असलेल्या 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिचे नाव जबरदस्तीने वापरले गेले आहे. सुकेशशी तिचा थेट संपर्क नव्हता, असे नोराने सांगितले.

तिने पुढे सांगितले की, सुकेशची पत्नी लीना मारिया पॉल हिच्यामार्फत ती सुकेशला ओळखत होती. नोराने सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून भेटवस्तू घेण्यास नकार दिला आहे. नोरा फतेहीने आपल्या वकिलामार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, 'फिर्यादीचे आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक नुकसान व्हावे यासाठी आरोपी क्रमांक 1 ने कट रचला होता.’ (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात आला नवा जोडीदार; Bunty Sajdeh ला डेट करत असल्याची चर्चा)

दरम्यान, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि ठग सुकेश चंद्रशेखर यांच्याविरुद्धच्या 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सोमवारी दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान जॅकलिन फर्नांडिस कोर्टात हजर झाली. न्यायालयातील या प्रकरणाची सुनावणी आठवडाभरासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी या प्रकरणाची सुनावणी 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. न्यायालयाने 15 नोव्हेंबर रोजी जॅकलिन फर्नांडिसला नियमित जामीन मंजूर केला होता. या प्रकरणी तिला अटक झाली नाही.