अभिनेत्री Kangana Ranaut चे Mahatma Gandhi बद्दल वादग्रस्त वक्तव्य; महाराष्ट्र कॉंग्रेस करणार कायदेशीर कारवाई
Nana Patole | (Photo Credits: ANI)

नुकतेच अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) 'भारताचे स्वातंत्र्य' या विषयावर विवादित वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरात गदारोळ माजला आहे. सोशल मिडीयावर कंगनावर सतत टीका होत आहे. अशात आता कंगना रणौतने महात्मा गांधींबद्दल (अभिनेत्री Kangana Ranaut चे Mahatma Gandhi बद्दल वादग्रस्त वक्तव्य; महाराष्ट्र कॉंग्रेस करणार कायदेशीर कारवाई) वादग्रस्त विधान केले आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिले आहे की, 'एकतर तुम्ही गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक… तुम्ही दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. कोणाचे व्हायचे ते तुम्हीच ठरवा.' तिने पुढे लिहिले आहे की, 'दुसरा गाल पुढे केल्याने भिक मिळते, स्वातंत्र्य नाही.'

कंगनाने तिच्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, ज्यांच्यात लढण्याची हिंमत नव्हती पण सत्तेची भूक होती त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना ब्रिटिशांच्या ताब्यात दिले. कंगनाच्या वक्तव्याबाबत काँग्रेसने हल्ला चढवत तिच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. ANI च्या वृत्तानुसार, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले म्हणाले, 'महाराष्ट्र काँग्रेस अभिनेत्री कंगना राणौतने महात्मा गांधींविरोधात केलेल्या कथित बदनामीकारक वक्तव्याविरोधात कायदेशीर कारवाई करेल. काँग्रेस त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करणार आहे.’

कंगनाच्या वक्तव्यावर व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, 'महात्मा गांधींबद्दल एक नृत्य करणारी महिला जे बोलत आहे ते वादग्रस्त आहे. ती महात्मा गांधींवर बोलण्यास लायक नाही. ही गोष्ट सूर्यावर थुंकण्यासारखी आहे. एका नर्तिकेच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. कंगना राणौतने तिच्या सोशल मिडीयावर एका जुन्या वृत्तपत्राचे कटिंग शेअर करत आपले मत मांडले होते. (हेही वाचा: भाजपला पर्याय देण्यासाठी शरद पवार यांची मोर्चेबांधणी, दिल्लीतील बड्या काँग्रेस नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश)

दरम्यान, नुकतेच कंगनाने एका टीव्ही चॅनलवर ‘भारताला 2014 मध्ये खरे स्वातंत्र्य मिळाले आणि देशाला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य 'भीक' होते’, असे वक्तव्य केले होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तिच्या वक्तव्याची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून, त्यानंतर अनेक ठिकाणी तिच्याविरोधात लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत.