Queen Remake : तब्बल चार भाषेत प्रदर्शित होणार कंगनाच्या 'क्वीन'चा रिमेक
क्वीन (संग्रहित - संपादित प्रतिमा)

Queen Remake : भारतामधील पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव चित्रपटांवरदेखील पडलेला दिसतो. जिथे हाताच्या बोटावर मोजण्याइतके स्त्री मध्यवर्ती भूमिका असलेले चित्रपट तयार होतात, तिथे एका जास्त लोकप्रिय नसलेल्या अभिनेत्रीला घेऊन एक स्त्रीप्रधान चित्रपट बनवला जातो, आणि पाहता पाहता त्या चित्रपटाची लोकप्रियता आणि प्रसिद्धी शिगेला पोहचते. या गोष्टीचे संपूर्ण श्रेय जाते ते त्या अभिनेत्रीला, लेखकाला आणि दिग्दर्शकाला. कंगना राणावत (Kangana Ranaut)चा ‘क्वीन’ (Queen) हा या गोष्टीचे चपखल उदाहरण होय. ज्या चित्रपटाने कंगनाला रातोरात स्टार बनवले, ज्या चित्रपटाने आघाडीच्या नायिकांमध्ये तिला स्थान दिले, त्या क्वीनचा आता एक नाही, दोन नाही तर तब्बल 4 भाषांमध्ये रिमेक होत आहे. तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दाक्षिणात्य चित्रपट निर्माते मनु कुमारन (Manu Kumaran) यांनी या चित्रपटाचे सर्व हक्क विकत घेतले आहेत. त्यांना आशा आहे की ज्या प्रकारे हिंदी क्वीनला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला तसाच या चार रिमेकलाही मिळेल. या चारही भाषांमधील चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या नायिका झळकणार आहेत, तर याचे दिग्दर्शनही वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी केले आहे. या रिमेकमध्ये काजल अग्रवाल (तमिळ), तमन्ना (तेलुगू), मजिंमा मोहन ( मल्याळम), आणि पारूल यादव (कन्नड) या अभिनेत्री 'राणी'ची भूमिका साकारणार आहेत.

फेब्रुवारी 2019 मध्ये या चारही चित्रपटांचा भव्य प्रीमियर पार पडेल, त्यानंतर दक्षिणेच्या पाचही राज्यांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. हिंदी क्वीनचे दिग्दर्शन विकास बेहलने केले होते, तर  लेखन परवीझ, चैताली आणि विकासने केले होते. क्वीन हा कंगनाच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला होता. या चित्रपटामुळे कंगनाच्या दमदार अभिनयाची सर्वांना कल्पना आली. याच चित्रपटामुळे आज कंगनाला बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखले जाते. आता या इतर चार भाषेत  प्रेक्षक क्वीनचा कसा स्वीकार करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.