सेकंडहँड गाडी खरेदी करताय? व्यवहार करण्याआधी या गोष्टींची काळजी नक्की घ्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Truebil)

सध्या लोकांच्या आरामदायी गोष्टींच्या गरजा प्रचंड वाढल्या आहेत. त्यात भारतात कारप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र काही लॅव्हीश कार्सच्या किंमती अक्षरशः गगनंल्या भिडल्या आहेत, त्यामुळे लोक सध्या सेकंड हँड गाड्यांना (Second hand Car) प्राधान्य देताना दिसून येत आहेत. भारतात सेकंड हँड कारचा बाजारही भरपूर मोठा आहे. पूर्वी मेकॅनिक, ड्रायव्हर किंवा गॅरेजवाल्यांकडून सेकंडहँड गाड्या मिळत असत. पण सध्या प्रोफेशनल यूज्ड कार डिलर्स बाजारात आहेत.मात्र अशा गाड्या खरेदीकरण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

> सर्वप्रथम कुठली गाडी विकत घ्यावी ठरवावे. त्यानंतर त्यासाठी योग्य डीलरचा शोध घ्यावा. गाडी पाहायला जाताना आपल्या विश्वासातला मेकॅनिक किंवा गाडय़ांबाबत माहिती असणाऱ्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला घेऊन जा.

> गाडीत काही फॉल्ट नाही ना, त्याला कुठे स्क्रॅच पडलेले नाहीत ना, गाडीचा क्लच, इंजिन, ब्रेक, गियर बॉक्स, गाडीचा आतील भाग, डेन्ट, बॅटरी अशा सर्व गोष्टींची व्यवस्थित तपासणी करावी. ऑइल, एअर, ट्रान्समिशन, इंधन, टायर अशा छोट्या गोष्टीही तपासून पहाव्यात.

> गाडी जर जर 40 हजारांपेक्षा जास्त चालवली असेल तर गाडीचे टायर बदलून घ्या. गाडीचा एकंदर अंदाज आल्यावरच किंमत ठरवा. (हेही वाचा: कार खरेदी करताय? मग डील करताना या गोष्टींची माहिती हवीच..)

> गाडीचा अंदाज येण्यासाठी किमान दहा किमी अंतरापर्यंत गाडी चालवा. यावेळी गाडीचे ब्रेक्स तपासून पाहा. प्रवासात इंजिन आवाज करते का नाही ते तपासा. दारे, खिडक्या, डॅशबोर्ड, एअर कंडिशन, फॅन, वायपर यांसारख्या गोष्टींकडेही लक्ष द्या.

> सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा म्हणजे गाडीची कागदपत्रे पूर्ण आहेत का याची तपासणी करणे. गाडीच्या विम्याची कागदपत्रे तपासून पाहा. इंजिन क्रमांक, चॅसी क्रमांक आणि गाडीचा नोंदणी क्रमांक एकच आहे का नाही हे तपासून पाहा. गाडीच्या सर्विसिंगची कागदपत्रे तपासून बघा. यासोबतच गाडीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही या गोष्टीची खात्री करून घ्या.