EV Charging Stations: महावितरण 2025 पर्यंत राज्यभरात सुरु करणार 2,375 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती स्थानके
Electric Vehicle | (Representational Purpose | PC: Pixabay.com)

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी, राज्य सरकार 2025 पर्यंत सर्व राज्य महामार्ग, बस थांबे आणि इतर प्रमुख ठिकाणी 2,375 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स (Electric Vehicle Charging Stations) उभारण्याची योजना आखत आहे. अहवालानुसार, प्रमुख स्थानांमध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद महामार्गांचा समावेश आहे. एकूण ईव्ही स्थानकांपैकी एकट्या मुंबईत 1,500 स्थानके असतील. पुण्यात 500, नागपुरात 150, नाशिकमध्ये 100, औरंगाबादमध्ये 75, अमरावतीमध्ये 30 आणि सोलापूरमध्ये 20 नियोजित आहेत.

पुण्यात 17, नवी मुंबईत 10, ठाणे आणि नागपूरमध्ये प्रत्येकी सहा आणि नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि अमरावतीमध्ये प्रत्येकी दोन चार्जिंग स्टेशनवर काम सुरू आहे. 13 आधीच स्थापित केले आहेत. यासाठी महावितरण- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEB)-  ची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने जवळपासचे ईव्ही स्टेशन ओळखण्यासाठी POWER मोबाईल ऍप्लिकेशन देखील विकसित केले आहे.

दुसरीकडे, मुंबईतील लोकांसाठी ग्रीन ऑफर आणि ई-मोबिलिटीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, टाटा पॉवर, भारतातील एकात्मिक ऊर्जा कंपन्यांपैकी एक आणि ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रदाता, यांनी निवासी सोसायट्या, मॉल्स, व्यापारी संकुल आणि इतर ठिकाणी 150 ग्रीन एनर्जीवर चालणारी स्टेशन्स स्थापित केली आहेत. (हेही वाचा: देशात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कारला लागली आग; मुंबईमध्ये टाटा नेक्सॉनच्या गाडीने घेतला पेट (Watch Video)

केंद्र सरकारने इलेक्ट्रिक चार्जिंग इकोसिस्टम सक्षम करण्यासाठी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला कोणत्याही परवान्याशिवाय सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची परवानगी दिली आहे. बस स्थानक, रेल्वे स्थानक, पेट्रोल पंप किंवा शॉपिंग मॉलजवळ कोणीही ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू करू शकतो. याव्यतिरिक्त केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महावितरण ईव्ही चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देण्यावर काम करत आहे. जर खाजगी व्यक्तींना चार्जिंग स्टेशन उभारायचे असेल तर त्यांना महावितरणकडून प्राधान्याने वीज पुरवठा केला जात आहे.