आशियातील सर्वात मोठा मोटर शो, ऑटो एक्सपो 2020 (Auto Expo 2020) ची तयारी पूर्ण झाली आहे. या 15 व्या ऑटो प्रदर्शनावर जगातील अनेकांचे लक्ष लागून आहे. कार आणि बाईकच्या चाहत्यांसाठी, यावेळी मोटर शो अनेक प्रकारे खूप खास असेल. यावेळी शोमध्ये इलेक्ट्रिक कारची (Electric Cars) जास्तीत जास्त चमक दिसून येईल. देशातील सर्वात मोठी कार निर्माता मारुती सुझुकीपासून ते आघाडीच्या एसयूव्ही वाहन निर्माता महिंद्रा आणि रेनो यांच्यापर्यंत या शोमध्ये अनेक प्रकारची इलेक्ट्रिक वाहने सादर केली जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या कार्सबद्दल -
मारुती फ्युटोरो-ई (Maruti Futuro-E) - मारुती सुझुकी यावेळी प्रथम फ्युटूरो-ईची पहिली इलेक्ट्रिक कार संकल्पना सादर करेल. ही एक कूप शैलीची इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. याबाबत अलीकडेच कंपनीने एक टीझरही जारी केला होता. मात्र या एसयूव्हीबद्दल अद्याप फारशी माहिती उपलब्ध झालेली नाही. गेल्या काही वर्षांपासून कंपनी आपल्या वॅगनआर इलेक्ट्रिकची चाचणीही करीत आहे.
महिंद्रा XUV 500 (Mahindra XUV 500) - इलेक्ट्रीफाई होण्याच्या या रेसमध्ये महिंद्रा मागे नाही. कंपनी यावेळच्या ऑटो एक्स्पोमध्ये एकाच वेळी 4 इलेक्ट्रिक वाहने सादर करणार आहे. आगामी XUV 500 इलेक्ट्रिक वर सर्वांच्या नजरा आहेत. मागील वर्षी, कंपनीने त्या वेळी एक्सयूव्ही 300 लाँच केले, तेव्हा कंपनीने एसयूव्ही वाहने देखील इलेक्ट्रिक विभागात सादर करण्याची घोषणा केली होती.
रेनॉल्ट झो (Renault Zoe) - फ्रान्सची आघाडीची वाहन निर्माता कंपनी रेनो आपली नवीन इलेक्ट्रिक कार झो भारतीय बाजारात आणणार आहे. ही छोटी कार जागतिक बाजारात यापूर्वीच सादर केली गेली आहे. या कारमध्ये कंपनीने 41 केडब्ल्यूएचची बॅटरी पॅक वापरल्याची बातमी आहे, जे सुमारे 300 ते 350 किमी पर्यंत ड्रायव्हिंग श्रेणी प्रदान करते. या व्यतिरिक्त ही कंपनी आपल्या लोकप्रिय हॅचबॅक कार क्विडचे इलेक्ट्रिक व्हर्जनही सादर करेल.
टाटा अल्ट्रोज (Tata Altroz) - टाटा मोटर्समने या वेळच्या मोटर शोमध्ये पूर्णतः इलेक्ट्रिकफाईची तयारी केली आहे. यावेळी कंपनी आपल्या प्रीमियम हॅचबॅक कार अल्ट्रोजचे इलेक्ट्रिक व्हर्जन सादर करेल. अल्ट्रोज ईव्हीमध्ये कंपनीने 30 किलोवॅट क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरली आहे. कंपनीने अद्याप आपल्या पॉवर ट्रेनबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही, परंतु रिपोर्ट्सनुसार, ही कार एकाच चार्जमध्ये 300 किमीपर्यंतची रेंज देईल. (हेही वाचा: Auto Expo 2020: 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार ऑटो इंडस्ट्रीमधील सर्वात मोठा इव्हेंट, 70 नवीन वाहने बाजारात येण्याची शक्यता)
ओरा आर 1 (Ora R1) - ऑटो एक्सपो 2020 मध्ये चिनी कंपन्या वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे. यावेळी चिनी कंपन्यांनी 20 टक्के पेक्षा जास्त जागा बुक केल्या आहेत. चीनची आघाडीची वाहन निर्माता कंपनी ग्रेट वॉल मोटर्स आपली नवीन इलेक्ट्रिक कार ओरा आर 1 सादर करेल. कंपनीने या कारमध्ये 35 केडब्ल्यू क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर वापरली आहे. एकदा चार्ज केल्यावर ही कार 351 किमी पर्यंत ड्राईव्हिंग रेंज देईल. असे सांगितले जात आहे की, ही जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत सुमारे साडेसहा लाख रुपये असेल.