Auto Expo /प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

वाहन उद्योगाशी संबंधित देशातील सर्वात मोठा ऑटो एक्सपो 2020 (Auto Expo 2020) चा मोटर शो, 7 फेब्रुवारीपासून ग्रेटर नोएडा (Greater Noida) येथे सुरू होणार आहे. हा कार्यक्रम 12 फेब्रुवारीपर्यंत चालेल. 6 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात अनेक देशी-परदेशी कंपन्या ऑटो तंत्रज्ञानासह, नवीन वाहने लाँच करुन त्यांची ओळख निर्माण करणार आहेत.

ऑटो एक्सपो दोन वेगळ्या भागांमध्ये विभागले गेले आहे. याचा पहिला भाग 'द मोटर शो' आहे, जो 7 ते 12 फेब्रुवारी दरम्यान ग्रेटर नोएडामध्ये होईल. त्याच वेळी, दुसरा भाग कम्पोनंट्सच्या शोचा आहे. प्रगती मैदान नवी दिल्ली येथे 6 ते 9 फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे.

ग्रेटर नोएडाच्या इंडिया एक्सपो मार्ट येथे हा कार्यक्रम होणार आहे. हा मार्ट 58 एकरांवर पसरला आहे. यामध्ये 56,000 चौरस मीटर, अधिवेशन सुविधा, व्यवसाय विश्रामगृह, व्हीआयपी लाउंज, व्यवसाय केंद्र, फूड कोर्ट, पार्किंग एरिया आणि वेअरहाउस सुविधा आहे. प्रदर्शन हॉलमध्ये पब्लिक वाय-फाय सेवेसह सीसीटीव्ही कव्हरेज आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आपण बुक माय शो वरून तिकिटे खरेदी करु शकतात. सर्व दिवसांच्या तिकिटांची किंमत 2750 रुपये आहे. यासाठी बुक माय शो 75 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक देत आहे. (हेही वाचा: MG Motor भारतात करणार 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक; MG eZs इलेक्ट्रिक एसयूव्हीसह, बाजारात आणणार 4 नवीन मॉडेल्स)

यंदा मागील वेळेपेक्षा 15 टक्के कमी कंपन्या ऑटो एक्सपो -2020 मध्ये भाग घेत आहेत. यावर्षी किमान 70 नवीन वाहने सादर केली जातील अशी माहिती आहे. मंगळवार, आजपासून कंपन्यांची तयारी सार्वजनिकपणे सुरू होईल, या कार्यक्रमात  ह्युंदाई आपली नवीन कार ऑरा बाजारात आणेल. तर मारुती सुझुकी आपले नवी डिझाईन देशी आणि परदेशी बाजारासमोर ठेवणार आहे. बुधवारी टाटा मोटर्स आपली नवीन कार अल्ट्रोजसह चार नवीन कार बाजारात आणणार आहे.

इंडियन ऑटो एक्सपो 2020 मध्ये प्रथमच एमजी मोटर्स एकूण 14 मॉडेल्स सादर करणार आहे. या 14 मॉडेल्समध्ये कंपनीचे क्लासिक ब्रिटिश मॉडेल्स आणि फ्यूचर इलेक्ट्रिक आणि ऑटोनॉमस मोबिलिटी मॉडेल्सचा समावेश आहे. जेव्हा देशातील वाहन उद्योग मागील तीन दशकातील सर्वात वाईट काळातून जात असताना, ऑटो एक्सपो -2020 घडत आहे. या मंदीमुळे Hero Motocorp, BMW, TVS, HMSI, Audi, Honda, Toyota Kirlosker, Nissan, Ashok Leyland  या कंपन्या या कार्यक्रमात भाग घेणार नाहीत.