MG Motor भारतात करणार 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक; MG eZs इलेक्ट्रिक एसयूव्हीसह, बाजारात आणणार 4 नवीन मॉडेल्स
MG ZS EV Electric SUV (Photo Credits: MG Motor India)

एमजी मोटर (MG Motor) ही वाहने बनविणारी कंपनी भारतामध्ये उद्योगधंदा वाढवण्यासाठी मोठी योजना आखत आहे. कंपनी भारतीय बाजारात अतिरिक्त 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळत आहे. मॉरिस गॅरेज (एमजी) मूळत: एक यूके कंपनी आहे, परंतु आता चीनच्या एसएआयसीकडे या कंपनीची मालकी आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनीने भारतात 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, कंपनीचा हलोल (गुजरात) कारखाना चालू झाला आहे. कंपनीने आतापर्यंत भारतात सुमारे 13,000 एमजी हेक्टरची विक्री केली आहे. एमजी मोटर इंडियाने नोव्हेंबरमध्ये हेक्टरच्या 3,239 वाहनांची विक्री केली आहे.

एमजी मोटर इंडियाचे मुख्य वाणिज्य अधिकारी गौरव गुप्ता यांनी सांगितले की, ‘जानेवारीमध्ये आमचा भारतातील प्रवास सुरु झाला, आम्ही भारतीय बाजारासाठी चांगली सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. देशासाठीची आमची योजना दीर्घकाळासाठी असून आम्ही आणखी 3,000 कोटींची गुंतवणूक करणार आहोत.’ कंपनी लवकरच एक इलेक्ट्रिक स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) सादर करेल आणि जुलै 2021 पर्यंत यात एकूण चार मॉडेल्स असतील. (हेही वाचा: काय सांगता? बाजारात आली रस्त्यावर तसेच आकाशात उडणारी कार; जाणून घ्या PAL-V ची वैशिठ्ये आणि किंमत)

ही सर्व वाहने एसयूव्ही वर्गातील असणार आहेत. यावर्षी एमजी मोटर एसयूव्ही हेक्टर भारतात प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. भारतीय कार बाजाराचे या कंपनीचे नाव नवीन असूनही, कंपनीच्या उत्पादनास ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. एमजी मोटर पुढील वर्षी जानेवारीत आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही ZS बाजारात आणण्याची अपेक्षा आहे. रिपोर्टनुसार या इलेक्ट्रिक एसयूव्हीची किंमत 22-25 लाख रुपयांपर्यंत असू शकते. एमजी मोटरची इलेक्ट्रिक एसयूव्ही झेडएस 44.5 किलोवॅट क्षमतेची बॅटरीसह सुसज्ज आहे, जी एकदा चार्ज केल्यावर 340 किमीची रेंज देते.