Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

आपण याआधी खुनाच्या अनेक खतरनाक कथा, प्रकरणे ऐकली असतील. चित्रपटांमध्येही अशा गोष्टी पहिल्या असतील. मात्र अमेरिकेच्या ओखलामा येथील हत्येची ही घटना ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. अमेरिकेच्या ओखलामा राज्यात तिहेरी हत्येचा आरोपी असलेल्या व्यक्तीने एका पीडितेचा खून करून तिचे काळीज बाहेर काढले आणि नंतर ते बटाट्यासोबत शिजवून इतर दोन लोकांचा खून करण्यापूर्वी त्यांना खायला घातले. अमेरिकन माध्यमांनी बुधवारी ही माहिती दिली. या ठिकाणी राहणाऱ्या Lawrence Paul Anderson वर हा आरोप आहे.

लॉरेन्सला जानेवारी महिन्यात तुरूंगातून सोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता असा आरोप आहे की, लॉरेन्स पॉल अँडरसनने या महिन्यात त्याच्या एका शेजारील व्यक्तीची हत्या केली आणि नंतर त्याचे काळीज बाहेर काढले. त्यानंतर हे काळीज घेऊन तो आपल्या काकांच्या घरी आला. तिथे त्याने ते शिजवले व आपले काका आणि काकू यांना ते जबरदस्तीने खायला घातले. तपास अधिकाऱ्यांनी मंगळवारी चिक्शा येथील ग्रॅडी काउंटी कोर्टात ही माहिती दिली. अँडरसनने काका आणि त्यांच्या चार वर्षाच्या नातीचा खून केला, तर काकूला गंभीररित्या जखमी केले. 9 फेब्रुवारीला ही घटना घडली आहे. (हेही वाचा: नौसैनिक मृत्यू प्रकरणात पालघर पोलिसांचा मोठा खुलासा -'खोटी असू शकते अपहरण आणि खुनाची कहाणी')

एका ड्रग केसमध्ये अँडरसनला 2017 मध्ये 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर ओक्लाहोमाच्या राज्यपालांनी त्यांची शिक्षा 20 वर्षांवरून नऊ वर्षे केली. मात्र, अँडरसनला तीन वर्षांच्या तुरुंगवासापेक्षा थोडी जास्त शिक्षा भोगल्यानंतर तुरूंगातून सोडण्यात आले. आता या तीन खुनानंतर राज्यपालांनी त्याची शिक्षा कमी करण्याच्या निर्णयावर मोठी टीका केली जात आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की त्याने 'आपल्या कुटूंबाला भुतांपासून मुक्त करण्यासाठी' बटाट्यासोबत हे हृदय शिजवले होते. त्याला ते आपल्या कुटूंबाला खायला द्यायचे होते. कोर्टात त्याच्या वकिलांनी त्याची मानसिकदृष्ट्या तपासणी व्हावी असे म्हटले आहे.