
जगभरात जसा कोविड 19 लसींचा डोस (COVID 19 Vaccine) देण्याचं प्रमाण वाढत आहे तशी आता परिस्थिती नियंत्रणामध्ये येण्यास सुरूवात झाली आहे. काल (25 ऑक्टोबर) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांनी अमेरिकेमध्ये परदेशी प्रवाशांना प्रवेश मिळावा याकरिता नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार, चीन, भारत आणि अनेक युरोपीय देशांवरील कडक निर्बंध हटवण्यात आले आहेत. व्हाईट हाऊसच्या (White House) आदेशानुसार, ही नवी नियमावली 8 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. अमेरिकेमध्ये आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंजुरी दिलेल्या लसी घेतलेल्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
कोविड 19 संसर्गाला रोखण्यासाठी 2020 च्या सुरूवातीला अमेरिकेकडून पहिल्यांदा प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले होते. पण आता जशी स्थिती पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे तशी अमेरिकेने हळूहळू आणि सुरक्षित पद्धतीने विमान सेवा देखील पूर्ववत करण्यास सुरूवात केली आहे. व्हाईट हाऊस कडून जारी केलेल्या नियमावलीनुसार, 18 वर्षांखालील मुलांना लस घेतली नसेल तरीही अमेरिकेत प्रवेश करण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्या देशांमध्ये 10%पेक्षा कमी लसीकरण झाले आहे अशा देशातील नागरिकांना देखील मुभा देण्यात आली आहे. या सवलती घेणार्यांना आणि अमेरिकेत 60 दिवसांपेक्षा अधिक दिवस राहणार्यांना लस घेणं आवश्यक आहे.
अमेरिकेने यापूर्वी 20 सप्टेंबरला दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला निर्बंध हटवण्यात आले आहेत. यामध्ये 33 देशातील नागरिकांना आणि पूर्ण लसवंतांना अमेरिकेत प्रवेश दिला जाणार होता. आता अमेरिकेत प्रवेश करणार्या प्रवाशांच्या लसीकरणाची पूर्ण माहिती गोळा करण्याचे आदेश अमेरिकन प्रशासनाने एअरलाईन्सला दिले आहेत.
अमेरिकेच्या CDC कडून सोमवारी देण्यात आलेल्या माहितीनुसार, एअरलाईन्स मध्ये नवी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नियमावली पाळणं आवश्यक आहे. याद्वारा इंटरनॅशनल एअर पॅसेंजरची माहिती मिळवणं गरजेचे आहे. सध्या अमेरिकेत प्रवेशासाठी अमेरिकन रेग्युलेटर्स आणि जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिलेल्या लसींना मान्यता असेल सोबतच मिक्स्ड डोस कोरोना वायरस व्हॅक्सिन देखील मान्य असतील.
परदेशी प्रवाशांना अमेरिकेत येण्यापूर्वी लस घेतल्याचं प्रमाणपत्र एअरलाईन कडे सादर करावं लागणार आहे. तसेच प्रवास करण्याच्या तारखेपूर्वी किमान 2 आठवडे आधी लसीचा दुसरा डोस घेणं आवश्यक आहे.