Tik Tok video app (Photo credit: Wiki Commons)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे अमेरिका-चीन (America-China) देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे चायनीज अॅप्सवर बंदी घालण्याच्या दृष्टीने अमेरिका पाऊलं उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर टिकटॉक अॅपची CFIUS कडून पडताळणी होत आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी Steve Mnuchin यांनी बुधवारी (29 जुलै) सांगितले की, "टिकटॉक या अॅपचे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पडताळणी सुरु आहे. आता लवकरच त्यासंदर्भातील रिपोट्स या आठवड्यात एजन्सी राष्ट्राध्यक्षांकडे सादर करेल."

दरम्यान, अमेरिकेतील परदेशी गुंतवणूक समिती (Committee on Foreign Investment) टिकटॉक या अॅपची तपासणी करत असल्याची माहिती पहिल्यांदाच अमेरिकेकडून देण्यात आली आहे. परदेशी गुंतवणूक समिती ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या धोक्यांची पाहाणी करते.

"सध्या टिकटॉक या अॅप CFIUS च्या अंतर्गत पाहाणी सुरु आहे. आम्ही या आठवड्यात याबद्दलची माहिती राष्ट्राध्यक्षांना देऊ. त्यामुळे आमच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध होतील," असे Steve Mnuchin म्हणाले.

बीजिंग बाईटडान्स टेक्नॉलॉजी को. या कंपनीचे टिकटॉक हे अॅप CFIUS ने तपासले असून त्याच्या 1 बिलियन डॉलरच्या खरेदी विषयी देखील चौकशी करण्यात आली आहे, अशी माहिती Reuters च्या रिपोर्टमध्ये नोव्हेंबरमध्ये नोंदवण्यात आली आहे. यापूर्वी टिकटॉक हे अॅप वैयक्तिक डेटा कसा स्टोअर करतो यावर कायदेतज्ञांनी सवाल उपस्थित केला होता.

टिकटॉकच्या एका प्रतिनिधीने सांगितले की, "टिकटॉकच्या CFIUS रिव्ह्यूबद्दल आम्ही काही बोलू इच्छित नाही. परंतु, टिकटॉक अॅप बनवताना सुरक्षेच्या दृष्टीने पूर्णपणे विचार करण्यात आला आहे. तसंच हा अॅप safe app चा अनुभव देतो."

दरम्यान, अमेरिकेची परदेशी गुंतवणूक समिती ByteDance कंपनीला करार रद्द करण्यास भाग पाडू शकते किंवा राष्ट्रीय सुरक्षा जपण्यासाठी दुसरे कोणतेही पाऊल उचलू शकते. रिपोर्टनुसार, ByteDance कंपनीला Sequoia आणि General Atlantic या दोन मोठ्या गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव मिळाला असून टिकटॉकमधील बहुतांश शेअर्समध्ये त्यांनी इंटरेस्ट दाखवला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या टेक्सास दौऱ्यापूर्वी टिकटॉप अॅपची पडताळणी करणार असल्याचे सांगितले होते. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि चीन यांच्यामध्ये कोरोना व्हायरस संकटामुळे होणाऱ्या वादामुळे वाशिंग्टनमधील कंपनीचे भवितव्य धोक्यात आहे. दरम्यान आम्ही टिकटॉक हे अॅप बॅन करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलत आहोत, असे अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी Mike Pompeo यांनी म्हटले आहे.