ब्रिटनमध्ये (Britain) हवामान खात्याने इतिहासातील पहिला 'रेड अलर्ट' जारी केला. ब्रिटनच्या हवामान खात्याने सांगितले की, इंग्लंडच्या बहुतांश भागांना 'रेड अलर्ट' अंतर्गत प्रथमच कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवार हा ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात उष्ण दिवस (Hottest Day Ever) होता जेव्हा तापमान प्रथमच 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. दक्षिण-पश्चिम लंडनमधील हिथ्रो येथे 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दक्षिण-पूर्व इंग्लंडमधील सरे येथे प्रथमच 39 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले. यापूर्वी 2019 मध्ये इंग्लंडमधील केंब्रिज बोटॅनिकल गार्डनमध्ये 38.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती.
ब्रिटनमधील लोकांना सध्या अनपेक्षित उष्णतेचा सामना करावा लागत आहे. राजधानी लंडनच्या काही भागात सोमवारची रात्र प्रचंड उष्ण होती आणि यावेळी तापमान 26 अंश सेल्सिअसवर स्थिरावले. राजधानी लंडनसह मध्य, उत्तर आणि दक्षिण-पूर्व इंग्लंडच्या भागात तीव्र उष्णतेमुळे ब्रिटनच्या हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून नद्या आणि तलावांमध्ये आंघोळ करताना किमान पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
कडक उन्हामुळे काही रस्ते बंद केले जाऊ शकतात, तर रेल्वे आणि उड्डाणेही रद्द होण्याची शक्यता आहे. उन्हामुळे रस्त्यावर अडकलेल्या नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. ही परिस्थिती पाहता, ब्रिटिश हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) ने देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे आणि हवामान खात्याने लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. सर्वसामान्यांना गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा: कोरोनानंतर आता प्राणघातक 'मारबर्ग विषाणू'चे थैमान; 2 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू, जाणून घ्या लक्षणे)
ब्रिटीश नागरिक अतिउच्च तापमान सहन करू शकत नाहीत, त्यामुळे हा इशारा देण्यात आला आहे. यूकेमध्ये सामान्यतः सौम्य उन्हाळा असतो. जुलैमध्ये सरासरी कमाल तापमान 21 डिग्री सेल्सिअस असते, तर सरासरी किमान तापमान 12 डिग्री सेल्सियस असते.