युक्रेनेचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky Car Accident) यांच्या कारला अपघात झाला आहे. झेलेन्स्की यांची कार कीव शहरातून निघाली असता त्यांच्या वाहनाला एका मोटारचालकाने धडक दिली. झेलेन्स्की सुरक्षीत आहेत. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. अशी माहिती त्यांच्या प्रवक्त्याने गुरुवारी (15 सप्टेंबर) सकाळी प्रसारमाध्यमांना दिली. किवमधून जाताना राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या कारला एका मोटारीने धडक दिली. झेलेन्स्की यांचे प्रवक्ते सेर्गी निकिफोरोव्ह यांनी दिलेल्या माहितीनसुार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 1:22 वाजता (22:22 GMT) ही घटना घडली. त्यांनी ही माहिती आपल्या फेसबुकवर पोस्ट केलेल्या निवेदनात दिली. झेलेन्स्की यांच्यासोबत असलेल्या डॉक्टरांनी त्यांना आपत्कालीन मदत पुरवली आणि पुढे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी झेलेन्स्की यांची पूर्ण तपासणी केली. यात ते कोणत्याही प्रकारे गंभीर जखमी अथवा दुखापतग्रस्त झाल्याचे आढळून आले नाही. दरम्यान, पंतप्रधानांचा सुरक्षा विभाग आणि स्थानिक पोलीस या अपघाताच्या घटनेचा पूर्ण तपास करतील. मोटार चालकाची कसून चौकशी करतील, अशी माहितीही झेलेन्स्की यांच्या प्रवक्त्याने दिली आहे. (हेही वाचा, Ukraine Railway Station Attack: युक्रेनच्या रेल्वे स्टेशनवर रशियाचा हल्ला, 22 जणांचा मृत्यू तर 50 जखमी)
दरम्यान, रशिया युक्रेन युद्ध अधिक लांबले असले तरी आता निर्णायक वळणावर आले आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या सैन्याने कीव प्रदेशातून रशियन सैन्याला पूर्वेकडील भागातून हद्दपार केले आहे. संपूर्ण डोनबास प्रदेश काबीज करण्याच्या क्रेमलिनच्या महत्त्वाकांक्षेला गंभीरपणे आव्हान दिले जात आहे.
ट्विट
Ukraine's Zelensky involved in car accident, not seriously injured
Read @ANI Story |https://t.co/oUlL1gEiTb#Ukrain #Zelenskiy #caraccident pic.twitter.com/ptWLm5yPqi
— ANI Digital (@ani_digital) September 15, 2022
दरम्यान, असेही वृत्त आहे की, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या मूळ गावातील पायाभूत सुविधांवर रशियाने बुधवारी क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यानंतर झेलेन्स्की यांनी खार्किव प्रदेशात पहिला दौरा केल्यानंतर युक्रेनियन सैन्याने आठवड्याच्या शेवटी तेथील हजारो चौरस मैलांचा प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला.
रशिया युक्रेन युद्धाचा जगावरही मोठा परिणाम झाला आहे. प्रामुख्याने रशिया आणि युक्रेन ही दोन राष्ट्रे गहू आणि खाद्य तेलाचे मोठे पुरवठादार आहेत. त्यातही युक्रेन हा जगातील सर्वात मोठा खाद्य तेल पुरवठादार आहे. त्यामुळे या युद्धामुळे जगभरातील खाद्यतेलाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. सोबतच जगातील विविध देशांमधील महागाईसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.