Boris Johnson | (Photo Credits: Facebook)

युनायटेड किंगडमचे (UK) पंतप्रधान बोरिस जॉनसन (PM Boris Johnson) यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे. या महिन्याच्या शेवटी, 26 जानेवारीला नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे होते. यूकेमध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) साथीची स्थिती पाहता पीएम जॉनसन यांनी ही आपली भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘पंतप्रधान जॉनसन यांचे आज सकाळी पंतप्रधान मोदींशी बोलणे झाले, यावेळी त्यांनी या महिन्याच्या शेवटी ते भारत भेटीला न येऊ शकल्याबद्दल खंत व्यक्त केली.’

प्रवक्त्याने सांगितले की, सध्या ब्रिटनमधील कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे नव्याने लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत देशातील आव्हानांचा सामना करता यावा यासाठी पीएम जॉनसन देशातच राहणार आहेत. सध्या नवीन स्ट्रेनमुळे ब्रिटन कडक लॉक डाऊनमध्ये आहे. मंगळवारी पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले की, संक्रमण ज्या तीव्रतेने पसरत आहे ते अत्यंत वाईट आणि चिंताजनक आहे. साथीचा रोग सुरू झाल्यापासून इंग्लंडमध्ये तिसऱ्यांदा लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. सोमवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूमुळे हे लॉकडाउन जाहीर केले.

सोमवारी रात्री टीव्हीवर दिलेल्या देशव्यापी भाषणात जॉन्सन म्हणाले, ‘आमच्या शास्त्रज्ञांनी पुष्टी केली आहे की नवीन स्ट्रेन हा 50 ते 70 टक्के अधिक संसर्गजन्य आहे. याचा अर्थ असा की यामुळे आपण संक्रमित होण्याची व इतरांना संक्रमित करण्याची शक्यता अधिक आहे.’ (हेही वाचा: England Lockdown: इंग्लंडमध्ये संपूर्ण लॉकडाऊन, Coronavirus संकटामुळे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची घोषणा)

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार, केवळ इंग्लंडमध्ये, कोविड-19 रूग्णांमध्ये मागील आठवड्यात जवळजवळ एक तृतीयांश वाढ झाली आहे आणि त्यांची संख्या सुमारे 27,000 वर गेली आहे. एप्रिलमध्ये जेव्हा महामारी वाढत होती तेव्हाच्या तुलनेत हा दर 40 टक्के जास्त आहे. 29 डिसेंबर रोजी, यूकेमधील 80,000 हजाराहून अधिक लोकांची चाचणी सकारात्मक आली आहे. गेल्या आठवड्यात संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येतही 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.