पाकिस्तानमध्ये गरिबीचा कहर; रस्ते व इमारतीनंतर आता कर्जासाठी इम्रान खान गहाण ठेवणार जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ
जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इम्रान खान (संग्रहित संपादित प्रतिमा)

दिवसेंदिवस ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेशी पाकिस्तान (Pakistan) वाईटरित्या झगडत आहे. पाकिस्तान सरकारकडे आता रोजचा खर्च चालविण्यास आणि कर्मचार्‍यांचे पगार देण्यासाठीही पैसे शिल्लक राहिले नाहीत. या महत्वाच्या समस्या दूर करण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान (Imran khan) यांनी, कराचीचे जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ (Jinnah International Airport) गहाण ठेवून त्यावर कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बदल्यात सरकार तीन बँकांकडून 452 कोटी डॉलर्स कर्ज घेईल. पाकिस्तानी चलनात ही रक्कम 70 हजार कोटी आहे. जिन्ना विमानतळ हे पाकिस्तानमधील सर्वात मोठे आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे विमानतळ आहे.

देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ म्हणूनही या विमानतळाकडे पहिले जाते. 2017-18 मध्ये सुमारे 67 लाख प्रवाश्यांनी या विमानतळाद्वारे प्रवास केला होता. विमानतळाची 1150 हेक्टर जमीन मीजान बँक, बँक ऑफ अल्फाला आणि दुबई इस्लामिक बँक यांच्याकडे तारण म्हणून ठेवली जाईल. मात्र पाकिस्तान सरकारच्या प्रवक्त्याने त्याविषयी काहीही सांगण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान सरकारने मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. नवाज शरीफ आणि परवेझ मुशर्रफ यांच्या काळात सरकारने जागतिक बँक, आयएमएफ आणि इतर बाह्य संस्थांकडून कर्जासाठी पीटीव्ही आणि रेडीओ, पाकिस्तानचे रस्ते आणि इमारती तारण ठेवल्या होत्या.

(हेही वाचा: 2022 मध्ये पाकिस्तान अंतराळात पाठवणार पहिला नागरिक, नेटकऱ्यांनी सोशल मीडियात उडवल्ली खिल्ली)

माजी गृहमंत्री आणि संसदेचे उच्च सभागृह सदस्य रहमान मलिक यांचे म्हणणे आहे की, 'विमानतळ गहाण ठेवण्याच्या निर्णयामुळे इम्रान खान यांचे अपयश दिसून येते. जेव्हा नेत्याकडे दृष्टी नसते तेव्हा अशा गोष्टी घडतात.’ महागाई कमी करणे आणि अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे ही इम्रान खान यांची सर्वात मोठी कसोटी आहे. दरम्यान दीड वर्षात पाकिस्तानवर 1,149 कोटी डॉलर्स परकीय कर्ज वाढले आहे. मे 2018 मध्ये हे कर्ज 9,540 कोटी डॉलर इतके होते. आता ते 11 हजार कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. आयएमएफच्या अहवालानुसार, चार वर्षांत पाकिस्तानवरील विदेशी कर्ज 13,000 कोटी डॉलर होईल. म्हणजेच इम्रान खान सत्तेत असताना ते, 36.3% वाढेल.