Terrorist Organisations: पाकिस्तानमध्ये सक्रीय आहेत तब्बल 12 दहशतवादी संघटना; अनेकांचे लक्ष्य आहे भारत, Report मधून धक्कादायक खुलासा
Terrorist (File Image)

पाकिस्तानवर (Pakistan) नेहमीच दहशतवाद्यांना (Terrorist) आश्रय दिल्याचा आरोप केला जातो. मात्र आता कॉग्रेसनल रिसर्च सर्व्हिस (CRS) या अमेरिकन संस्थेच्या अहवालातही याची पुष्टी झाली आहे. पाकिस्तानमध्ये 12 दहशतवादी संघटना (Terror Outfits) सक्रिय असल्याचे अहवालातून समोर आले आहे. अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या पाच दहशतवादी संघटनांचे लक्ष्य भारत आहे, ज्यात लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मुहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांचा समावेश आहे. उर्वरित सात विदेशी दहशतवादी संघटना आहेत. सीआरएसने आपल्या अहवालात म्हटले आहे की, अमेरिकन अधिकाऱ्यांनी पाकिस्तानमधील अनेक ऑपरेशनल अड्डे आणि दहशतवाद्यांचे अतिरेकी गट ओळखले आहेत. यापैकी काही संघटना 1980 पासून पाकिस्तानमध्ये सक्रिय आहेत.

अमेरिकन काँग्रेसने क्वाड कॉन्फरन्स दरम्यान जारी केलेल्या अहवालात हे स्पष्ट करण्यात आले आहे की, या सर्व दहशतवादी संघटना पाकिस्तानमधून कार्यरत आहेत. या पाच प्रकारच्या संघटना आहेत. ज्यातील काही संपूर्ण जगाला लक्ष्य करतात, तर काहींचे लक्ष्य अफगाणिस्तान आहे. त्याचवेळी पाच दहशतवादी संघटना भारत आणि काश्मीरला लक्ष्य करतात. इतर दोन पाकिस्तान आणि शिया समुदायावर दहशतवादी हल्ले करत आहेत.

अहवालात असे सांगण्यात आले आहे की लष्कर-ए-तैयबा ही दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये 1980 मध्ये स्थापन झाली. 2001 मध्ये ती जागतिक दहशतवादी संघटना म्हणून तयार करण्यात आली. 2008 मध्ये याच दहशतवादी संघटनेने मुंबईवर हल्ला केला. याशिवाय या संघटनेने अनेक मोठे दहशतवादी हल्लेही केले आहेत. जैश-ए-मोहम्मदची स्थापना 2002 मध्ये झाली. त्याचा संस्थापक मसूद अझहर होता. नंतर 2001 मध्ये ती परदेशी दहशतवादी संघटना म्हणून तयार करण्यात आली. या दहशतवादी संघटनेचा भारताच्या संसदेवरील हल्ल्यात सहभाग होता.

हरकत-उल-जिहाद-इस्लामी ही दहशतवादी संघटना 1980 मध्ये अफगाणिस्तानमध्ये स्थापन झाली. त्याची स्थापना सोव्हिएत सैन्याशी लढण्यासाठी करण्यात आली होती, परंतु 2010 मध्ये ती जागतिक दहशतवादी संघटना म्हणून ओळखली गेली. 1989 पासून या दहशतवादी संघटनेने भारतात हल्ले सुरू केले आहेत. तीच दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात तालिबानशी लढण्यासाठी मदत पाठवत असे. अज्ञात शक्तीसह ही संघटना अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतात कारवाया करत आहे आणि काश्मीर पाकिस्तानमध्ये विलीन व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. (हेही वाचा: Afghanistan: पुरुषांना जे शक्य नाही ते महिला करतील, तालिबानी सरकारचा नवा निर्णय)

हिज्बुल मुजाहिद्दीन (HM) ही दहशतवादी संघटना 1989 मध्ये स्थापन झाली होती, ही पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या इस्लामवादी पक्षाची दहशतवादी शाखा आहे आणि 2017 मध्ये FTO च्या यादीत त्याचा समावेश झाला. जम्मू -काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेली ही सर्वात मोठी आणि सर्वात जुनी दहशतवादी संघटना आहे.

पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या इतर दहशतवादी संघटनांमध्ये अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS), इस्लामिक स्टेट खोरासन प्रांत (ISKP किंवा I-K), अफगाण तालिबान, हक्कानी नेटवर्क, तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP), बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA), जुंदल्ला (उर्फ जैश अल-अदल), सिपाह-ए-साहाबा पाकिस्तान (SSP) आणि लष्कर-ए-झांगवी (LEJ) यांचा समावेश आहे.