धक्कादायक! 'महिला फुटबॉलपटूंची छाती सपाट, त्या लग्नासाठी योग्य नाहीत कारण त्या पुरुषांसारखे दिसतात’; 'या' देशाच्या राष्ट्रपतींचे वादग्रस्त वक्तव्य
Samia Suluhu Hassan (संग्रहित संपादित प्रतिमा)

यावर्षी मार्चमध्ये सामिया सुलुहु हसन (Samia Suluhu Hassan) यांनी टांझानियाच्या (Tanzania) पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. माजी राष्ट्रपती जॉन मगुफुली यांचे आजारपणामुळे निधन झाल्यानंतर त्यांनी हे पद स्वीकारले. आता सामिया सुलुहु हसन स्त्रियांबाबत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. सामिया सुलुहु हसन यांनी महिला फुटबॉलपटूंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. त्या म्हणाल्या होत्या की, ‘सपाट छाती असलेल्या महिला फुटबॉलपटू लग्नासाठी योग्य नाहीत. त्यांना पाहून, कोणीही हे ओळखू शकणार नाही की त्या महिला आहेत. त्या पुरुषांसारखे दिसतात.’

हसन यांचे हे विधान अशावेळी आले आहे जेव्हा त्या आफ्रिकेच्या एकमेव महिला प्रमुख आहेत ज्या सेवेमध्ये आहेत. इथिओपियाच्या अध्यक्ष सहले-वर्क झेवडे यांची भूमिका प्रामुख्याने औपचारिक आहे. एएफपीच्या अहवालानुसार, हसन महिला फुटबॉलपटूंबद्दल म्हणाल्या होत्या की, ‘तर तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले तरी तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण तुम्हाला लग्नासाठी आकर्षक महिला हव्या आहेत पण त्या गोष्टी महिला फुटबॉलपटूंमध्ये दिसत नाहीत.’

22 ऑगस्टच्या रात्री एका प्रादेशिक फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये देशाच्या पुरुष संघाचा विजय साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या समारंभात, सामिया यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर पुढे म्हणाल्या की, ‘आज त्या देशाला ट्रॉफी मिळवून देत आहेत, ज्यामुळे एक राष्ट्र म्हणून नक्कीच याचा अभिमान आहे. परंतु जर का त्यांच्या पुढच्या आयुष्याकडे पाहिले तर, जेव्हा त्यांचे पाय खेळून खेळून थकतील तेव्हा त्यांच्याकडे पूर्वीसारखा फिटनेस नसेल. तेव्हा त्या कशाप्रकारचे आयुष्य जगतील? लग्न करणे त्यांच्यासाठी स्वप्नासारखे आहे कारण जर तुमच्यापैकी कोणी तिला आपली पत्नी म्हणून घरी नेले, तर तुमची आई विचारेल की ती एक स्त्री आहे की तुमचा पुरुष सहकारी.’ (हेही वाचा: Dr. Gail Omvedt Passes Away: डॉ. गेल ओमवेट यांचे निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

हसन यांची ही टिप्पणी सोशल मीडियावर येताच टीकेची झोड उठली. महिला फुटबॉलपटूंबाबत केलेल्या अशा विधानांबद्दल लोक त्यांची निंदा करत आहेत.