Taliban Prohibits Photographing Living Things: तालिबानचे आणखी एक नवीन फर्मान, जिवंत गोष्टींचे फोटो-व्हिडिओ काढण्यावर बंदी
Taliban (Photo Credits: Getty Images)

Taliban Prohibits Photographing Living Things: अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानचे (Taliban) सरकार आल्यापासून सातत्याने नवनवीन फर्मान जारी केले जात आहेत. याच क्रमाने तालिबानने आणखी एक नवीन फर्मान जारी केले आहे. तालिबानने अडीच दशके जुन्या कायद्याची पुन्हा अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अफगाणिस्तानच्या कंदाहारमधून तालिबान देशभर पसरले. याच कंदाहारमध्ये नव्या नियमानुसार अधिकारी यापुढे 'जिवंत गोष्टींचे’ फोटो किंवा व्हिडिओ काढू शकणार नाहीत.

तालिबानचे आदेश म्हणतात की, जिवंत गोष्टींचे फोटो अथवा व्हिडिओ शूट केल्याने फायद्यापेक्षा जास्त नुकसानच होईल. कंदाहारसाठी जारी करण्यात आलेला हा आदेश अफगाणिस्तानात तालिबान राजवटीत असतानाच्या काळोख्या काळाची आठवण करून देणारा आहे.

साधारण 1996 ते 2001 या काळात अफगाणिस्तानमध्ये टेलिव्हिजनवरही बंदी घालण्यात आली होती. तेव्हाही जिवंत लोकांचे फोटो काढण्यावर बंदी होती. कंदहारच्या राज्यपालांच्या प्रवक्त्याने एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना या आदेशाला दुजोरा दिला. ते म्हणाले की हे निर्बंध सामान्य जनता आणि 'स्वतंत्र माध्यमांना' लागू नाहीत, तर फक्त अधिकाऱ्यांना लागू असेल. नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्यांनी औपचारिक आणि अनौपचारिक बैठकांमध्ये जिवंत गोष्टींचे फोटो घेणे टाळावे. आदेशानुसार, मजकूर नमूद करणे आणि ऑडिओ रेकॉर्ड करणे अशा गोष्टींना परवानगी आहे. (हेही वाचा: Afghanistan Landslide: अफगाणिस्तानच्या नूरिस्तान प्रांतात भूस्खलन, 25 ठार, 10 जखमी)

दरम्यान, अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच तालिबानने महिलांच्या शिक्षणावर बंदी घातली. नोव्हेंबर 2022 मध्ये, महिलांना काबूलमध्ये पार्क आणि जिममध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली होती. डिसेंबर 2022 मध्ये तालिबानने महिलांना विद्यापीठात जाण्यासही बंदी घातली होती. जानेवारी 2023 मध्ये, तालिबानने बल्ख प्रांतात पुरुष डॉक्टरांना महिला रुग्णांवर उपचार करण्यास बंदी घातली. पुढे जुलै 2023 मध्ये तालिबानने एका महिन्याच्या आत सर्व ब्युटी सलून बंद करण्याचा आदेश जारी केला होता.