Sri Lanka Police. (Photo Credit: File)

21 एप्रिल रोजी श्रीलंका (Sri Lanka) आठ साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली होती. राजधानी कोलंबो (Colombo) इथे वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या स्फोटांमुळे इतर देशांनाही हादरा बसला होता. त्यानंतर श्रीलंकेतील राजकीय, सामाजिक परिस्थिती पूर्णतः बदलून गेली. आता देशात मोठ्या प्रमाणावर जातीय हिंसाचार उफाळायला सुरुवात झाली आहे. यामुळे देशात संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री 9 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला जाईल. सध्याचे तणावाचे वातावरण पाहता देशात सोशल मिडीयावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

(हेही वाचा: श्रीलंकेत बॉम्ब स्फोट हल्ल्यानंतर बुरखा- नकाबवर बंदी)

ईस्टर संडेला कोलंबो इथे चर्च आणि हॉटेल्स अशा अशा ठिकाणी 8 बॉम्बस्फोट घडले. यामध्ये 250 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. इसिसने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती, त्यांना स्थानिक दहशतवादी संघटना तौहिद जमात यांची मदत मिळाल्याचे सांगितले गेले होते. आता या घटनेनंतर सिंहली आणि ख्रिश्चन लोकांनी मुस्लिम लोकांना टारगेट करायला सुरुवात केली आहे. यामध्ये जो हिंसाचार घडला त्यामध्ये मशिदी, मुस्लिम दुकाने, घरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

हा हिंसाचार थांबवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला होता, तसेच अश्रुधूरही सोडवा लागला होता. दरम्यान एका फेसबुक पोस्टमुळेही फार मोठा वाद उद्भवला होता, त्यामुळे फेसबुक, व्हॉटस्ऍप, व्हिबर, आयएमओ, स्नॅपचॅट, इस्ट्राग्राम आणि यू टय़ूब यावर बंदी घालण्यात आली आहे. शेवटी परिस्थिती पूर्णतः हाताबाहेर जाऊ नये म्हणून देशात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.