जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. कोरोनाची लागण झाल्याने जगभरातील साडेसहा हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक देशातील सरकार सध्या कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना करत आहे. अशातच दक्षिण कोरियामधील (South Korean) एका चर्चमध्ये (Church) कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून देण्यात आलेले पवित्र पाणी प्यायल्याने 46 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
दक्षिण कोरियाची राजधानी असणाऱ्या सेऊलच्या दक्षिणेकडील गेईयॉनगी प्रांतामधील 'रिव्हर ऑफ ग्रेस कम्युनिटी चर्च'मध्ये हा प्रकार घडला आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 1 मार्च ते 8 मार्चच्या दरम्यान, या चर्चमध्ये एका महिला कर्मचाऱ्याने एका बाटलीमधून भाविकांच्या तोंडामध्ये पवित्र पाणी दिलं होतं. (हेही वाचा - Coronavirus Outbreak: नागपूरमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांची Breath-Analyser तपासणी थांबवली)
विशेष म्हणजे ही महिला भाविकांना अशा प्रकारे पाणी देत असतानाचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे तब्बल 46 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात चर्चमधील मुख्य धर्मोपदेशक आणि त्यांच्या पत्नीचाही समावेश आहे. कोरोनाची लागण होऊ नये, तसेच झाली तरी त्यांचा खात्मा होईल या अंधश्रद्धेतून पाण्याचे वाटप करण्यात आले होते. मात्र, या पाण्यातून येथील भाविकांना कोरोनाची लागण झाली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दक्षिण कोरियामधील सर्व चर्च 8 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. या चर्चमध्ये आलेल्या सर्व भाविकांची तपासणी करण्यात येणार आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे अनेकांचा बळी गेला आहे. आज कोरोनामुळे महाराष्ट्रातील पहिला बळी गेला आहे. मुंबईत कस्तुरबा रूग्णालयात 65 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा रुग्ण दुबईवरून प्रवास करून भारतात आला होता. देशात आतापर्यंत 3 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. याअगोदर कर्नाटकातल्या कलबुर्गीमध्ये 76 वर्षीय वृद्धाचा आणि दिल्लीत 68 वर्षीय महिलेचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.