William Amos (संग्रहित संपादित प्रतिमा)

कॅनडाच्या (Canada) संसदेला आपल्या एका सदस्याच्या कृतीमुळे लाजेने मान खाली घालावी लागली आहे. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) हाऊस ऑफ कॉमन्सच्या डिजिटल बैठकीदरम्यान, अचानक एक खासदार कपड्यांविना कॅमेरासमोर आला. आपल्या सहकारी खासदाराची ही कृती पाहून सभेत उपस्थित सर्व सदस्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कॅनडाच्या संसदेच्या कार्यकाळात नग्न दिसणारे खासदार यांची ओळख विल्यम आमोस (William Amos) म्हणून केली गेली आहे. ते क्यूबेक (Quebec) जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटनुसार, आमोस एका डेस्कच्या मागे नग्न उभे असल्याचे दिसत आहे आणि आपला खासगी भाग त्यांनी मोबाईलने झाकलेला आहे.

हे त्यांनी मुद्दाम केले की नकळत ही चूक घडली हे अजून समजू शकले नाही. माध्यमात ही बातमी आल्यानंतर खूपच गदारोळ माजला. त्यानंतर एका ईमेल निवेदनात आमोस यांनी माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘ही घटना फारच दुर्दैवी आहे. जॉगिंगवरून परत आल्यानंतर, मी कामाच्या ठिकाणी घालायचे कपडे बदलत होतो त्याचवेळी माझा व्हिडिओ चुकून सुरु झाला. या अनवधानाने घडलेल्या चुकीबद्दल मी हाऊस ऑफ कॉमन्सची आणि माझ्या सहकार्‍यांची माफी मागतो. नक्कीच ही एक अपघाती चूक होती आणि ती पुन्हा होणार नाही.’ कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर, कॅनडाचे बरेच नेते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संसद अधिवेशनात हजेरी लावत आहेत. (हेही वाचा: नॉर्वेच्या पंतप्रधानांना COVID19 चे नियम मोडणे पडले महागात, पोलिसांनी ठोठावला 'इतका' दंड)

विरोधी पक्षाचे ब्लॉक क्वेबकोइस पक्षाचे खासदार क्लॉड डीबेलेफ्यूले (Claude DeBellefeuille) यांनी प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमानंतर ही घटना उपस्थित केली. यावेळी, संसदेच्या पुरुष सदस्यांनी संसदेच्या मर्यादेनुसार ट्राऊझर, शर्ट आणि जाकीट व टाय घालावे अशी सूचना केली गेली. या गोष्टीला उर्वरित सदस्यांनीही पाठिंबा दर्शविला. त्यानंतर सभागृह अध्यक्ष Anthony Rota यांनी खासदारांना, जेव्हा जेव्हा कॅमेरा आणि मायक्रोफोन चालू असेल तेव्हा जागरुक राहण्याची आठवण करून दिली. कॅनडाच्या संसदेने अद्याप या खासदाराविरोधात कोणतीही कारवाई करण्याचे संकेत दिले नाहीत.