
इस्लामिक देश सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) 12 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वृत्तानुसार, गेल्या 10 दिवसांच्या आत या 12 जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांचा गळा तलवारीने चिरला गेला आहे. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अहिंसक गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा थांबवण्याची भाषा केली होती. पण ज्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे त्यांच्यावर अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 12 जणांना अंमली पदार्थ बाळगणे/तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या लोकांकडे सापडलेले ड्रग्ज उच्च-स्तरीय औषधांच्या श्रेणीत समाविष्ट नाहीत, तरीही या लोकांचे गळे चिरण्यात आले आहेत. सौदी अरेबिया सरकारने शरिया कायद्यांतर्गत ज्या लोकांचा गळा कापला आहे, त्यात 3 पाकिस्तानी, 4 सीरियन, 3 सौदी आणि 2 जॉर्डनच्या नागरिकांचा समावेश आहे.
या वर्षी मार्चमध्ये सौदी सरकारने 81 जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावण्यात आलेल्या 81 लोकांपैकी 73 सौदी, 7 येमेनी आणि 1 सीरियन नागरिक होते. या लोकांवर बलात्कार, मुलांचे अपहरण, हत्या, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असे आरोप होते. तसेच काही लोक अल कायदा आणि ISIS सारख्या इस्लामिक दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. (हेही वाचा: Indonesia Earthquake: इंडोनेशियात भूकंप, 260 हून अधिक नागरिकांचा मृत्यू; असंख्य जखमी, मालमत्तेचे मोठे नुकसान)
सौदी अरेबियामध्ये या वर्षी आतापर्यंत एकूण 132 जणांना फाशी देण्यात आली आहे, जी गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे. 2021 मध्ये सौदी सरकारने 69 जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर 2019 मध्ये 187 जणांना ही शिक्षा सुनावण्यात आली होती. विशेष म्हणजे 2018 मध्ये सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी सांगितले होते की, प्रशासनाने फाशीची शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. खून किंवा हत्याकांडात दोषी आढळणाऱ्यांनाच फाशीची शिक्षा दिली जात आहे.