Earthquake (Photo Credits: Pixabay)

इंडोनेशियाच्या जावा बेटावर झालेल्या भूकंपातील (Earthquake in Indonesia) मृतांची संख्या मंगळवारी 268 वर पोहोचली आहे. मदत आणि बचावकार्य करताना मृतांचा शोध घेण्यात आला. या वेळी अनेक मृतदेह हातील लागले. या सर्वांना त्यांच्या नातेवाईकांद्वारे दफन करण्यात येत आहे. इंडोनेशियाच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या प्रांत असलेल्या पश्चिम जावामधील कोसळलेल्या इमारतींमधून नागरिकांचे मृतदेह आणि त्यांच्या मृत शरीरांचे तुकडे इतस्तत: विखुरलेले आढळत होते. जमीनीवर मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा असल्याने मृतांपर्यंत पोहोचणे कठीण होत होते. तसेच, मदत आणि बचाव कार्यातही अडथळा येत होता.

भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची नोंद सोमवारी 5.6-रिश्टर स्केल इतकी झाली. भूकंपाचा केंद्र बिंदू सियांजूर शहराजवळ होता. भूकंपामुळे जीवित आणि वित्त हानी प्रचंड प्रमाणावर झाली आहे. मृतांचा आकडा आणखीही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या बाजूला कोसळलेल्या इमारती, उखडलेले रस्ते आणि कोलमडून पडलेली यंत्रणा आदींमुळे झालेल्या नुकसानीची अद्याप मोजदाद पूर्ण झाली नाही.

इंडोनेशियाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण एजन्सीआणि बीएनपीबीचे प्रमुख सुहार्यान्तो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मंगळवारी नंतर मृत्यूची संख्या पुन्हा नाट्यमयरित्या 162 वरुन 268 वर गेली. अद्यापही कमीतकमी 151 लोक बेपत्ता आहेत आणि 1,000 हून अधिक जखमी झाले आहेत.

इंडोनेशियामध्ये भूकंपग्रस्तांना मदत आणि बचावकार्य अजूनही सुरुच आहे. अद्यापही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्यावर अजूनही लक्ष केंद्रित केले जात आहे.