रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) हे त्यांना जे आवडते तेच करतात. कधी या गोष्टी कायद्याच्या विरोधात असतात, कधी समाजाच्या विरोधात असतात, तर कधी व्यवस्थेच्या विरोधात असतात. परंतु पुतीन कोणाचीही पर्वा करत नाहीत आणि युक्रेनवरील हल्ला हे त्यांच्या जिद्दीचे ताजे उदाहरण आहे. युक्रेनमध्ये अक्षरशः कहर माजवणारे व्लादिमीर पुतिन यांच्यावर बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. स्वत:ला रशियन उद्योगपती असे सांगणाऱ्या या व्यक्तीने जाहीर केले आहे की, जो कोणी पुतीन यांना अटक करेल त्याला साडेसात कोटींचे बक्षीस मिळेल.
अॅलेक्स कोनानीखिन (Alex Konanykhin) असे या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अॅलेक्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या व्हायरल होत आहे. अॅलेक्स कोनानीखिन यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये व्लादिमीर पुतिन यांचा फोटोही आहे, ज्यामध्ये ‘मृत किंवा जिवंत’ असे लिहिले आहे. व्यावसायिकाने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'मी वचन देतो की जो कोणी आपले घटनात्मक कर्तव्य बजावेल आणि पुतीनला रशियन आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार युद्ध गुन्हेगार म्हणून अटक करेल, त्याला मी $ 1,000,000 देईन'.
अॅलेक्सने लिंक्डइनवर लिहिलेल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, ‘पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष नाहीत. त्यांनी विशेष ऑपरेशनचा भाग म्हणून रशियामधील अनेक अपार्टमेंट्स, इमारती उडवून दिल्या. यानंतर त्यांनी निवडणुका घेतल्या नाहीत. त्यांनी संविधानाची पायमल्ली केली. त्यांनी आपल्या विरोधकांना मारले. रशियाचा नागरिक या नात्याने, नाझीवाद आणि पुतीन यांच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी रशियाला मदत करणे हे माझे नैतिक कर्तव्य आहे.’ या रशिया आणि युक्रेन युद्धात पुतीन विरोधात आपली बाजू मांडणाऱ्या युक्रेनला आपण मदत करत राहणार असल्याचे अॅलेक्सचे म्हणणे आहे. (हेही वाचा: रशियाच्या विरोधात ट्विटर-फेसबुक, गुगल आणि अॅपलसारख्या बड्या टेक कंपन्यांनी उचलले हे पाऊल)
दरम्यान, 1992 मध्ये, अॅलेक्स कोनानिखिनच्या कंपन्यांची कमाई 22 अब्ज रुपयांपेक्षा जास्त होती. त्या वर्षी ते रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्यासोबत अमेरिकेला गेलेल्या शिष्टमंडळाचा एक भाग होते. 1996 मध्ये त्यांना आणि त्यांच्या पत्नीला व्हिसा फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र नंतर अॅलेक्स तेथून झेक प्रजासत्ताक आणि नंतर न्यूयॉर्कला गेले. नंतर त्यांनी बोरिस येल्त्सिन आणि रशियन अधिकाऱ्यांवर आपला जीव धोक्यात आणल्याचा आरोप केला. अॅलेक्स कोनानिखिन यांचे नेहमीच रशियन सरकारशी तणावाचे संबंध राहिले आहेत. 1996 मध्ये त्याला रशियन सरकारने अनियमिततेचा आरोप करून अटकही केली होती.