Pranay Pathole आणि Elon Musk (संग्रहित संपादित प्रतिमा)

पुण्यातील अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी प्रणय पाथोळे (Pranay Pathole), हा टेस्लाचे सह-संस्थापक आणि प्रमुख इलॉन मस्क (Elon Musk) यांचा 'ट्विटर मित्र' आहे. होय, 2018 मध्ये, प्रणय पाथोळेने टेस्लाच्या स्वयंचलित विंडस्क्रीन वायपर्सबद्दल आणि पाऊस पडल्यावर त्याच्या समस्यांबद्दल ट्विट केले होते, ज्याला इलॉन मस्कने लगेच प्रत्युत्तर दिले आणि लिहिले की, ‘पुढील अपडेटमध्ये हे निश्चितपणे ठीक केले जाईल.’ आता 2022 मध्ये प्रणय पाथोळे हे ट्विटरवर एक प्रसिद्ध नाव बनले आहे कारण तो इलॉन मस्क यांचा मित्र बनला आहे.

प्रणयच्या गिटहब प्रोफाइलनुसार, तो एक मशीन लर्निंग इंजिनियर आहे. ट्विटरवर तो अवकाश आणि रॉकेटबद्दल लिहित राहतो. आता तो टेस्ला, स्पेसएक्स, न्यूरालिंक आणि द बोरिंग कंपनीचे सह-संस्थापक आणि प्रमुख इलॉन मस्क यांच्याशी ट्विटरवर जोडला गेला आहे. दोघांमधील मैत्री इतकी वाढली आहे की ते एकमेकांशी डायरेक्ट मेसेज (DM) मध्येही अनेक मुद्द्यांवर बोलतात. (हेही वाचा: Elon Musk Second Baby: टेस्ला अब्जाधीश एलोन मस्क यांना कन्यारत्नाचा लाभ)

प्रणय पाथोळे सध्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) साठी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत आहे. ट्विटरवर त्याचे 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. प्रणयच्या फॉलोअर्समध्ये जगातील अनेक बड्या सेलिब्रिटींचाही समावेश आहे. प्रणयने 2020 मध्ये मंगळ ग्रहाचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. या ट्विटवर इलॉन मस्क यांचेही उत्तर आहे, ज्यात त्यांनी मानवाला मंगळावर नेण्याबाबत भाष्य केले आहे. मस्कच्या या उत्तराला 28 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

23 वर्षीय प्रणयने नुकतेच हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘जेव्हा इलॉन मस्कने मला उत्तर दिले, तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता. आता मी त्यांच्याशी ट्विटरवर आरामात बोलू शकतो.’ प्रणय पुढे म्हणाला, ‘आम्ही बर्‍याच विषयांवर बोलतो. यामध्ये जास्त करून इतर ग्रहांवर मानवी जीवन घेऊन जाण्याच्या विषयांचा समावेश असतो. कारण आज मानवतेला वाचवण्यासाठी मंगळावर जाणे आवश्यक झाले आहे.’