इम्रान खान (Photo Credits-Twitter)

‘नवा पाकिस्तान’ (Pakistan) निर्माण करण्याचे ध्येय घेऊन इम्रान खान (Imran Khan) सत्तेत आले. मात्र त्यानंतर पाकिस्तानच्या प्रगतीचा आलेख किंचितही वाढला नाही. उलट इम्रान खान सरकारने इतरांकडून कर्ज घेण्याचा नवा विक्रमाच प्रस्थापित केला. आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानमधील सत्ताधारी इम्रान सरकारने, आपल्या एक वर्षाच्या कालावधीत विक्रमी कर्ज घेतले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, एका वर्षात देशाचे एकूण कर्ज 7509 अब्ज रुपयांनी (पाकिस्तानी) वाढले आहे. पाकिस्तानी माध्यमात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने हा कर्ज डेटा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

पाकिस्तान सरकारने ऑगस्ट 2018 ते ऑगस्ट 2019 दरम्यान परदेशातून 2804 अब्ज रुपये आणि देशांतर्गत स्त्रोतांकडून 4705 अब्ज रुपयांची कर्जे घेतली गेली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत पाकिस्तानचे सार्वजनिक कर्ज 1.43 टक्क्यांनी वाढले आहे. फेडरल सरकारचे हे कर्ज 32,240 अब्ज रुपये झाले आहे. ऑगस्ट 2018 मध्ये हे कर्ज 24,732 अब्ज रुपये होते. सध्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत सरकारची कर वसुली 960 अब्ज रुपये होती, जे 1 ट्रिलियन रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा कमी आहे. (हेही वाचा: आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानला पुन्हा दणका; हैद्राबाद निजामाच्या 300 कोटींच्या संपत्तीची मालकी भारताकडेच)

पाकिस्तानने घेतलेल्या कर्जांपैकी सर्वात जास्त कर्ज चीनकडून घेतले आहे. कर्जामुळे परकी चलन संकटही पाकिस्तानसमोर आले आहे. आयएमएफच्या मते, जून 2022 पर्यंत पाकिस्तानला चीनला 6.7 अब्ज डॉलर्स द्यावे लागतील. एकीकडे हा कर्जाचा बोझा वाढत तर दुसरीकडे पाकिस्तान अजून कर्जे घेत आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकने (ADB) बुधवारी जाहीर केले की, प्रादेशिक बँक या वर्षात पाकिस्तानला 2.7 बिलियन डॉलर देईल.