पाकिस्तानात कोरोनामुळे अडकलेले 114 भारतीय नागरिक येत्या 9 जुलैला अटारी-वाघा बॉर्डर मार्गे भारतात येणार
Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: PTI)

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विविध देशात भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. याच कारणास्तव भारत सरकारने वंदे भारत मिशन अंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना आपल्या मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. याच दरम्यान आता पाकिस्तानात  (Pakistan) अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण येत्या 9 जुलैला पाकिस्तानात कोरोना व्हायरसमुळे अडकलेल्या 114 भारतीय नागरिकांना अटारी-वाघा बॉर्डर मार्गे भारतात आणण्यात येणार आहे.

पाकिस्तान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 114 भारतीय नागरिकांना त्यांच्या मायदेशी परतता येणार आहे. भारतीयांना अटारी-वाघा बॉर्डरच्या मार्गे भारतात पाठवताना अत्यावश्यक हेल्थ सिक्युरिटी प्रोटोकॉलचा वापर करण्यात येईल असे ही त्यांनी म्हटले आहे.(Coronavirus:जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 1.11 कोटी पेक्षाही अधिक)

यापूर्वी जुन महिन्यात सुद्धा पाकिस्तानातील विविध शहरात अडकलेल्या 748 भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात आले होते. त्यावेळी सुद्धा या नागरिकांना अटारी-वाघा बॉर्डरच्या माध्यमातून पाठवण्यात आले होते. परंतु त्यावेळी अटारी- वाघा बॉर्डर 25-27 जून दरम्यान खुली करण्यात आली होती. तर पाकिस्तानातून आलेल्या भारतीय नागरिकांना 14 दिवस क्वारंटाइन सुद्धा करण्यात आले होते.(पाकिस्तान मध्ये ट्रेन आणि बस च्या धडकेत 19 शीख भाविकांंचा मृत्यू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं दुःख)

पाकिस्तानातील कोरोना व्हायरसच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाल्यास रुग्णांचा आकडा 2 लाख 31 हजारांच्या पार गेला आहे. तसेच गेल्या 24 तासात आणखी 3 हजार 344 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 50 जणांचा बळी गेला आहे. पाकिस्तानात आतापर्यंत एकूण 4 हजार 762 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच पाकिस्तान सरकारमधील पंतप्रधान इमरान खान यांचे आरोग्य सल्लागार जफर मिर्जा यांना सुद्धा कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे मिर्जा यांनी घरीच आयसोलेशन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.