
Hajj Pilgrims Die in Mecca: सौदी अरेबियातील मक्का (Mecca) येथे उष्णतेमुळे या वर्षी हज यात्रे (Hajj Yatra 2024) दरम्यान, 1,000 हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात एएफपीने वृत्त दिले आहे. मक्कामध्ये तापमान 49 अंश सेल्सिअस (120 अंश फॅरेनहाइट) पर्यंत वाढल्याने हजारो लोकांवर उष्माघातामुळे उपचार केला जात आहे. इजिप्तमधील सुमारे 658 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 630 नोंदणी न केलेले यात्रेकरू होते. सूत्रांनुसार, मरण पावलेल्यांमध्ये 90 भारतीयांचा समावेश आहे. याशिवाय, जॉर्डन, इंडोनेशिया, इराण, सेनेगल, ट्युनिशियामधील यात्रेकरूंचाही उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे.
तथापी, अनेक यात्रेकरू बेपत्ता असल्याची नोंद आहे. फेसबुक आणि इतर सोशल मीडिया नेटवर्कवर बेपत्ता झालेल्यांची छायाचित्रे आणि माहितीसाठी विनंती करण्यात आली आहे. सौदी सरकारच्या म्हणण्यानुसार, जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक असलेल्या या वर्षीच्या हजमध्ये 1.8 दशलक्षाहून अधिक लोक सामील झाले आहेत. (हेही वाचा -Hajj 2024: हज यात्रेदरम्यान उष्णतेमुळे 550 यात्रेकरुंचा मक्का येथे मृत्यू; इजिप्शियन आणि जॉर्डन नागरिकांचाही मृतांमध्ये समावेश)
खबरदारीच्या उपायांचा एक भाग म्हणून, हज अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंना छत्री बाळगण्यास आणि हायड्रेटेड राहण्यास सांगितले आहे. सौदी सैन्याने उष्माघातग्रस्तांना उपचारासाठी वैद्यकीय तुकड्यांसह 1,600 हून अधिक कर्मचारी आणि 30 जलद प्रतिसाद पथके तैनात केली आहेत. यासंदर्भात CNN ने वृत्त दिले आहे. याशिवाय, 5,000 आरोग्य आणि प्रथमोपचार स्वयंसेवक देखील तैनात करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी 240 यात्रेकरूंचा मृत्यू -
सोमवारी, राष्ट्रीय हवामान केंद्राने मक्का येथील ग्रँड मस्जिद येथे 51.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, प्रदेशातील तापमान प्रत्येक दशकात 0.4 अंश सेल्सिअसने वाढत आहे. तथापी, गेल्या वर्षी हज यात्रेदरम्यान, 240 यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता.