Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून अमेरिका, युरोपासह भारतामध्ये झपाट्याने पसरणार्‍या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आता लस आणि औषध शोधण्याचं काम जगभरात सुरू आहे. दरम्यान लस निर्मितीच्या या कामामध्ये आता अमेरिकेकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोमवार, 17 मे दिवशी Moderna या कोरोना व्हायरस विरूद्ध लस तयार करणार्‍या कंपनीने केलेल्या दाव्यानुसार त्यांच्या लसीचे मानवी शरीरावर सुरूवातीच्या टप्प्यात समाधानकारक निकाल दिसत आहेत. mRNA vaccine (mRNA-1273)चे मानवी शरीरातील निकाल दिलासादायक आहेत. यामुळे रोगप्रतिकार शक्तीला चालना मिळून जीवघेण्या आजाराशी लढण्याची क्षमता वाढत आहे.

Moderna कडून तयार केली जाणारी लस ही WHO च्या कोरोना विरूद्ध लढण्यासाठी विकसित होत असलेल्या टॉप 8 लसींपैकी एक आहे. दरम्यान US FDA कडून त्यांना फेज 2 च्या ट्रायल्सची परवानगी मिळाली आहे. आता फेज 3 साठी प्रोटोकॉल बनवण्याचं काम सुरू असून जुलै 2020 पर्यंत त्यालाही सुरूवात होईल असा दावा करण्यात आला आहे. सध्या अमेरिकेमध्ये ट्रम्प प्रशासनाकडून Moderna, Johnson & Johnson, आणि फ्रांसच्या Sanofi या कंपनीला लस निर्मितीच्या कार्यासाठी फंडींग पुरवले जात आहे.

कोरोना व्हायरसने सध्या जगभरामध्ये थैमान घातले आहे. मागील काही महिन्यात कोरोना व्हायरसमुळे 3 लाखापेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर लस शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जगभरात डझनभर लसींवर काम सुरु आहे. त्यापैकी निम्म्या चीन मध्ये असल्याचं London School of Hygiene & Tropical Medicine ने सांगितलं आहे.

केवळ प्रभावी आणि सुरक्षित लस शोधणं हे संशोधकांसमोर आव्हान नाही तर त्याचे कोट्यावधी डोस बनवणे हे देखील आव्हान आहे. त्यामुळे क्लिनिकल ट्रायलसोबत आता Moderna कडून मोठ्या स्वरूपात लॅब बनवण्याचं काम देखील सुरू आहे. Moderna ने औषध निर्माण करणारी कंपनी Lonza सोबत करार केला असून त्याच्या माध्यमातून 1 बिलियन डोस तयार करण्याचं लक्ष आहे.