प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

जवळजवळ गेली 3 वर्षे कोरोना विषाणू (Coronavirus) साथीशी झुंज देऊन आता कुठे जग पुन्हा रुळावर येऊ लागले आहे. याआधी माणसांसह प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली होती. आता पहिल्यांदाच प्राण्याद्वारे मानवाला कोरोनाची लागण करण्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेतील इंडियानामध्ये हे प्रकरण समोर आले आहे. इंडियानाच्या प्राणीसंग्रहालयातील सिंहापासून कोरोनाव्हायरस मानवांमध्ये पसरला आहे. एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे.

अभ्यासात असे म्हटले आहे की हा विषाणू पहिल्यांदाच प्राणीसंग्रहालयातील प्राण्यापासून माणसात पसरला आहे, असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. सिंहाला खायला-प्यायला देणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. अभ्यासानुसार, इंडियाना प्राणीसंग्रहालयातील 20 वर्षीय आफ्रिकन सिंहाला कोरोनाची लागण झाली होती. या सिंहामुळे जी व्यक्ती या सिंहाची काळजी घेत होती तिलाही कोरोनाची लागण झाली.

सिंहाला डिसेंबर 2021 मध्ये कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सिंहाला खोकला सुरु झाला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यावेळी प्राणीसंग्रहालयातील 10 कर्मचारी या सिंहाच्या संपर्कात आले होते. सर्वांची कोरोना चाचणी झाली आणि सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते, मात्र आठवडाभरानंतर पुन्हा तीन कामगार पॉझिटिव्ह आढळले. (हेही वाचा: H3N2 Virus Scare: H3N2 हाँगकाँग फ्लूमुळे भारतात पहिल्या मृत्यूची नोंद; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती)

अभ्यासानुसार, तीन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सिंह आणि या तिघांचे नमुने तपासण्यात आले. यावेळी दिसून आले की, सिंह आणि दोन कर्मचाऱ्यांच्या विषाणूचे एकच जेनेटिक स्ट्रेन होते. तिसऱ्या कर्मचाऱ्याची नीट चौकशी होऊ शकली नाही. सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2021 मध्ये सिंहाला दोन डोसची कोरोना लसही देण्यात आली होती. आतापर्यंत अनेक प्राण्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पहिल्यांदा न्यूयॉर्क शहरातील प्राणीसंग्रहालतील प्राण्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. एप्रिल 2021 मध्ये न्यूयॉर्क शहरातील ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयात एका वाघाला कोरोनाची लागण झाली होती.