Vladimir Putin News: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निधनाचे वृत्त क्रेमलिनने फेटाळले, संतापही केला व्यक्त
Vladimir Putin | (Photo Credits: Wikimedia Commons)

Vladimir Putin Death News: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची सत्तेवरील पकड अद्यापतरी कायम असली तरी त्यांना अनेक अफवांचा सामना करावा लागत आहे. खास करुन अलिकडील काही वर्षांमध्ये त्यांच्या आरोग्याविषयी असंख्य बातम्या येत आहेत. ज्यात थायरॉईड कर्करोग, पार्किन्सन रोग, कुष्ठरोग आणि स्ट्रोक यांसह आणकी काही आजारांचा आणि लक्षणांचा समावेश आहे. या आठवड्यात तर त्यांच्याविषयी आलेल्या बातम्यांनी चक्क क्रेमलिन सुद्धा भडकले. इंटरनेटवर आणि काही प्रसारमाध्यमांतून बातम्या आल्या की, पुतिन यांना बेडरुममध्येच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. अर्थात या वृत्ताची पुष्टी कोणीच केली नाही. तसेच, क्रेमिलीननेही (Kremlin) हे वृत्त फेटाळले आहे.

पुतीन यांच्याबाबत मररने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पुतिन यांच्या मृत्यूची बातमी प्रसारित करणार्‍या टेलिग्राम चॅनेल जनरल एसव्हीआरने असेही ठामपणे सांगितले की पुतिन अजूनही जिवंत असल्याचे भासवण्यासाठी क्रेमलिन बॉडी डबल वापरत आहे. टेलिग्राम चॅनलचा दावा क्रेमिलीनने फेटाळला आहे.

व्लादिमीर पुतिन यांनी 1999 मध्ये रशीयाची सत्ता हाती घेतल्यापासून ते आधुनिक इतिहासातील सर्वात शक्तीमान आणि कुख्यात राजकीय व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. त्यांनी रशियावर मजबूत पकड ठेवली आहे. त्यांचा सध्याचा कार्यकाळ पुढील वर्षी संपणार असला तरी. सन 2020 मध्ये सादर करण्यात आलेल्या घटनात्मक सुधारणांमुळे त्यांना 2036 पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्तापदावर राहण्याची संधी मिळू शकते.

दरम्यान,पुतिन यांनी युक्रेनमध्ये राबवलेली लष्करी मोहीम आणि रशियन सैन्याचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान यामुळे जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे. शिवाय दोन दशके त्यांनी जपलेली पोलादी नेतृत्वातील असुरक्षीतता प्रथमच उघडी पडली. हळूहळू ते वार्धक्याकडे झुकत आहेत. त्यामुळे या नेत्याच्या नेतृत्वावर रशियन जनतेतूनही प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

व्लादिमीर पुतिन यांना अलिकडेच जून 2023 मध्ये त्यांचे माजी सहयोगी, येवगेनी प्रीगोझिन यांनी केलेल्या सशस्त्र बंडाचा आव्हानात्मक सामना करावा लागला. येवगेनी प्रीगोझिन यांच्या सैन्याने मॉस्कोवर कूच करण्यासाठी आणि रशियाचे लष्करी नेतृत्व उलथून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही राजकीय तडजोडींमुळे हा प्रयत्न खुद्द येवगेनी यांनीच मागे घेतला. नुकतेच विमान अपघातात त्यांचे संशयास्पद निधन झाले. ते वॅग्नर खाजगी लष्करी कंत्राटदाराचे मालक होते. लष्करी आदेशावर त्यांनी केलेल्या स्पष्टवक्ते टीकेमुळे पुतिन यांच्या राजवटीला आणि विश्वासार्हतेला धोका निर्माण झाला. ज्यामुळे राष्ट्रपती पुतिन यांनी यवगेनी यांचे वर्तन म्हणजे "विश्वासघात" आणि "देशद्रोह" असल्याच म्हटले होते. तसेच, याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही म्हटले.