BJP | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

भाजपच्या (BJP) बांधणीपासून ते आजवरच्या इतिहासावर आधारित अभ्यासक्रम आता थेट इंडोनेशियातील इस्लामिक विद्यापीठात (Indonesia Islamic University)  विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार असल्याचे समजतेय. मागील दोन सलग केंद्रीय निवडणुकांमध्ये भाजपचा विजय झाल्याने शैक्षणिक तज्ज्ञांना भाजपच्या जडणघडणीवरून असणारी कुतूहलता पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे या विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या अभ्यासक्रमासाठी 'भारतीय जनता पार्टी- भूत, वर्तमान आणि भविष्य' जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाची कथा हे पुस्तक विद्यापीठात समाविष्ट करून घेतले जाणार आहे. शंतनू गुप्ता लिखित या पुस्तकातून दक्षिण आशियाई विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या अंतर्गत शिक्षण दिले जाणार आहे.

इंडोनेशिया इस्लामिक विद्यापीठ आंतरराष्ट्रीय संबंध विभागातील शिक्षक हादझा मिन फाधली यांनी पीटीआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, या सोशल मीडियाच्या जगात राजकीय स्पर्धा अटीतटीची होत असतानाही भाजपने भारतात सलग दोनदा केंद्रीय निवडणुकीत विजय मिळवला आहे, साहजिकच यामुळे इंडोनेशियाच्या अनेक अभ्यासकांना भाजपच्या पाया विषयी कुतुहूल निर्माण झाले आहे. अलीकडेच फालधी हे कौटिल्य फिलोशिप प्रोग्राम अंतगर्त भारतात आले असताना त्यांना या पुस्तकाविषयी माहिती मिळाली असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, इंडोनेशिया आणि भारताचे संबध सुधारायचे असल्यास त्यासाठी तिथल्या सरकारला समजून घेणे गरजेचे आहे, त्यामुळे हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे असे म्हणताना भाजपकडून ही अशा प्रकारचे पाऊल उचलले जावे अशी इच्छा फालधी यांनी बोलून दाखवली. या पुस्तकाचे लेखक शंतनू गुप्ता यांनी आपल्या पुस्तकाला एवढा मोठा जागतिक स्तरावरील मान देण्यासाठी इंडोनेशया सरकारचे आभार मानले आहेत, या पुस्तकात भाजपच्या स्थापनेपासून ते भाजपच्या दृष्टिकोनातून भारतीय स्वातंत्र्य लढा मांडण्यात आला आहे.