भारतीय वंशाच्या 25 वर्षीय पुरुषाला कॅनडामध्ये (Indian-Origin Man Arrested) अटक करण्यात आली आहे. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (Royal Canadian Mounted Police) ने एका निवेदनात केलेल्या पुष्टीनुसार, सदर व्यक्तीने कॅनेडियन वॉटर पार्कमध्ये (Canadian Water Park) महिलांसोबत छेडछाड (Sexual Abuse) केल्याचा आरोप आहे. या व्यक्तीने मॉन्क्टन येथील सार्वजनिक वॉटर पार्कमध्ये महिलांची कथीतपणे 7 जुलै रोजी छेड काढली. त्याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. हा माणूस वॉटर पार्कमधून फिरत होता आणि त्याने किमान बारा पीडितांना अयोग्यरित्या स्पर्श केल्याची नोंद होती. पीडितांमध्ये काही जण 16 वर्षाखालील होते.
आरोपीस घटनास्थळावरुन अटक
आरसीएमपीच्या अधिकाऱ्यांना तक्रार प्राप्त होता. ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयितास त्वरीत शोधून काढले आणि तो वॉटर पार्क आवारात असतानाच त्याला अटक केली. कॅनडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले मात्र काही काळात त्याची सुटका झाली. दरम्यान, आता त्याला 24 ऑक्टोबर रोजी मॉन्क्टन प्रांतीय न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांनी अधिकृतरित्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सदर तक्रारीचा तपास अद्यापही सुरु आहे. आरोपीने खरोखरच हे कृत्य केले का, तसेच, त्याने इतरही काही लोकांना त्रास दिला आहे का, त्याच्यावर या आधीही अशाच प्रकारचे आरोप झाले आहेत का, यांसह इतर अनेक बाबींचा तपास सुरु असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाशी संबंधित कोणाला माहिती असेल त्यांनी पुढे येण्याचे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे. (हेही वाचा, Sexual Abuse: गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षिकेने केले अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण, फोनवर पाठवले अश्लील मेसेज, 33 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा)
RCMP द्वारे पालकांना अवाहन
दरम्यान, अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "आम्ही पालकांना त्यांच्या मुलांशी 7 जुलै रोजी या ठिकाणी उपस्थित असल्यास त्यांच्याशी बोलण्यास सांगत आहोत. आम्हाला लोकांना संगायचे आहे की, लैंगिक अत्याचाराची तक्रार केव्हाही केली जाऊ शकते. तुम्ही लैंगिक गैरवर्तनाला बळी पडल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. तुमचे ऐकले जाईल आणि तुमच्यावर विश्वास ठेवला जाईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
भारतापुरते बोलायचे झाल्यास, भारतीय कायद्यानुसार, लैंगिक गैरवर्तन प्रकरणात एफआयआर कोणत्याही पोलीस ठाण्यात किंवा जिथे गुन्हा घडला त्याच्या जवळच्या ठिकाणी दाखल केला जाऊ शकतो. कोणीही, मित्र किंवा नातेवाईकांसह, गुन्ह्यातून वाचलेल्या व्यक्तीच्या वतीने एफआयआर देखील दाखल करू शकतो. तथापि, रिपोर्टिंगच्या वेळी, पीडितेला एक स्टेटमेंट द्यावे लागेल जे एक महिला पोलीस अधिकारी एफआयआरमध्ये नोंदवेल. दरम्यान, भारतीय न्याय संहिता नुकतच लागू झाल्याने आता त्यातील विविध कलमांद्वारे एफआयआर नोंदवला जातो.