26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड Hafiz Saeed ला सुनावली 31 वर्षांची शिक्षा; पाकिस्तान न्यायालयाचा निर्णय
Hafiz Saeed (Photo Credit - PTI)

26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला (Hafiz Saeed) पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने 31 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. अहवालानुसार, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदला दोन प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हाफिज सईदने कथितरित्या बांधलेली मशीद आणि मदरसा ताब्यात घेतला जाईल. या दहशतवादी मास्टरमाइंडवर 340,000 रुपयेचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

2020 मध्ये हाफिज सईदला दहशतवादविरोधी न्यायालयाने टेरर फंडिंग प्रकरणात 15 वर्षांची शिक्षा सुनावली होती. हाफिज सईदला 2019 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अमेरिका भेटीपूर्वी अटक करण्यात आली होती. यावर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले होते की, सईदला 10  वर्षांच्या प्रयत्नानंतर ताब्यात घेण्यात आले आहे ही मोठी गोष्ट आहे.

दहशतवादी हाफिज सईद हा जमात-उद-दावाचा (जेडीयू) प्रमुख आहे. त्याला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. याशिवाय अमेरिकेने 10 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे इनामही त्याच्यावर ठेवले आहे. त्याचबरोबर हाफिज सईद हा भारतासाठीही मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. कारण सईद हा 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड होता. या हल्ल्यात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा: इम्रान खान सरकारला मोठा झटका; सर्वोच्च न्यायालयाने डेप्युटी स्पीकरचा निर्णय ठरवला घटनाबाह्य, 9 एप्रिलला होणार मतदान)

शुक्रवारी दहशतवाद विरोधी न्यायालयाचे न्यायाधीश एजाज अहमद यांनी सईदला पंजाब पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागाने नोंदवलेल्या दोन एफआयआ 21/2019 आणि 90/2019 मध्ये शिक्षा सुनावली. सईदला लाहोरमधील कोट लखपत तुरुंगातून न्यायालयात आणण्यात आले. सईद जुलै 2019 पासून या तुरुंगात बंद आहे. हाफिज सईद लाहोरहून गुजरानवालाला जात असताना जुलै 2019 मध्ये दहशतवादविरोधी विभागाने (CTD) त्याला अटक केली होती.