Donald Trump (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण जगभरात पसरू लागल्यावर आता राजकीय व्यक्ती, कलाकार मंडळी, सेलिब्रिटी सर्वांनीच याची धास्ती घेतली आहे. अलीकडेच कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीला सुद्धा या व्हायरसची बाधा झाल्याचे समोर आले होते, त्यामुळे अनेकांंनी आपली आरोग्य चाचणी करून घेण्याचे ठरवले आहे. अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची सुद्धा कोरोनाची चाचणी (Corona Test) करण्यात आली होती, या टेस्टचा निकाल आता समोर आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना सुदैवाने या व्हायरसची लागण झाली नसल्याचे रिपोर्ट्स मध्ये म्हंटले आहे. अमेरिकेत आतापर्यंत 110 जणांना कोरोनाची लागण झाली होती त्यापैकी 43 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती काल डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती.

प्राप्त माहितीनुसार, व्हाईट हाऊस तर्फे डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोरोनाच्या चाचणीचा रिपोर्ट जाहीर करण्यात आला, यात ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शरीराचे तापमान सुद्धा नॉर्मल आहे आणि त्यांची प्रकृती सुद्धा ठणठणीत आहे असे या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे.

ANI ट्विट

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे. अशा वेळी नॅशनल एमर्जन्सी अॅक्ट अंतर्गत आरोग्य विभागाचा अधिकाधिक बजेट हा आजार रोखण्यासाठी वापरला जाणार आहे, यानुसार, तब्बल 5 हजार कोटी म्हणजेच 50 अब्ज डॉलरची तरतूद कोरोना हटवण्यासाठी करण्यात आल्याचे सुद्धा ट्रम्प यांनी सांगितले होते.