विजय माल्या | (Photo Credits: PTI/File)

भारतीय बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन देशाबाहेर पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या ( Vijay Mallya) कर्जाची 100% परतफेड करण्यास तयार आहे. विजय मल्ल्याने बुधवारी (5 , डिसेंबर) केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी भारतीय बँकांचे सर्व कर्ज परत करण्यास तयार आहे. मात्र, या कर्जावरील व्याज देणे मला शक्य होणार नाही. विजय मल्ल्याने एकापाठोपाठ तीन ट्विट केली आहेत. या ट्विटच्या माध्यमातून त्याने बँकांसमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावत तो म्हणतो की, माझ्या सोबत जे वर्तन घडले ते योग्य नाही. भारतीय राजकारणी आणि मीडिया पक्षपाती असल्याचेही विजय मल्ल्याने म्हटले आहे. विजय मल्ल्यावर तब्बल 9000 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

विजय मल्ल्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'गेल्या तीन दशकांमध्ये किंगफिशर या सर्वात मोठ्या मद्यउत्पादक समूहाने भारतात व्यवसाय केला आहे. या कालावधीमध्ये या समूहाने अनेक राज्यांना मदत केली आहे. किंगफिशर एअरलाईन्सनेही सरकारकडे मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा केली आहे. मात्र, एका शानदार एअरलाईन्सची दुख:द अखेर झाली. पण, तरीसुद्धा मी बँकांच्या कर्जाची परतफेड करण्यास तयार आहे. बँकांनी कृपा करुन त्याचा स्वीकार करावा.'

आपल्या इतर ट्विटमध्ये मल्ल्या म्हणतो की, 'भारतातील राजकारणी आणि प्रसारमाध्यमं जोरजोराने ओरडून सांगत आहेत की, मी पीएसयू बँकांचा पैसा उडवणारा डिफॉल्टर आहे. पण, हे सगळे खोटे आहे. माझ्यासोबत नेहमीच पक्षपात केला गेला. माझ्यासोबत योग्य व्यवहारवर्तन का केले जात नाही? मी कर्नाटक उच्च न्यायालयात कर्जाचा निपटारा करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. याचे मला आतीव दु:ख होते.'

विजय मल्ल्याने पुढे म्हटले आहे की, 'किंगफिशर एअरलाईन्स ही वाढत्या तेलदराची शिकार ठरली. किंगफिशर एक शानदार एअरलाईन्स कंपनी होती. जीने क्रूड ऑईलच्या 140 डॉलर प्रति बॅरल इतक्या महागड्या किंमतीचा सामना केला. तोटा वाढत गेला. बँकांचा पैसा यातच जाऊ लागला. मी बँकांना 100 टक्के कर्जाची परतफेड करण्याची ऑफर दिली आहे. बँकांनी कृपा करुन ती स्वीकारावी.'

दरम्यान, विजय मल्ल्याने अनेक बँकांकडून सुमारे 9000 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड न झाल्याने बँकांनी त्याला डिफॉल्टर म्हणून घोषीत केले आहे. तर, भारताने त्याला पळपूटा जाहीर केले आहे. मल्ल्याने लंडन न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावनीदरम्यान दावा केला की, त्याच्याजवळ समर्थन करण्यासाठी अनेक मुद्दे आणि त्याचे पुरावेही आहेत. त्याने अधिकाऱ्यांवर खापर फोडत म्हटले की, 'तुम्ही बिलियन पाउंड्सचे स्वप्न पाहात राहू शकता.' मार्च 2016पासून मल्ल्या इंग्लंडमध्ये आहे. आणि त्याला 18 एप्रील रोजी प्रत्यार्पण वॉरंटनुसार स्कॉटलँड यार्डने पकडले होते. केंद्रीय अन्वेशन विभाग (CBI) त्याचा तपास करत आहे.