Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: Getty Images)

चीनमध्ये (China) कोरोनाचा (Coronavirus) कहर थांबताना दिसत नाही. कोरोना विषाणूच्या आगमनानंतर आता दोन वर्षांनी चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोविड प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बीजिंगच्या स्मशानभूमीत शनिवारी कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी हाणामारीसारखी परिस्थिती निर्माण झाली. शांघायने कोविडची प्रकरणे वाढल्यामुळे त्यांच्या बहुतेक शाळांना ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश दिले आहेत. शांघायच्या एज्युकेशन ब्युरोनुसार सोमवारपासून नर्सरी आणि चाइल्ड केअर सेंटर देखील बंद होतील.

याआधी चीनने देशातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी शून्य कोविड धोरण अवलंबले होते. मात्र राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या या धोरणाविरोधात देशात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. त्यांनतर चीनने एका आठवड्यापूर्वी अचानक आपला कोविड व्यवस्थापन प्रोटोकॉल बदलला. मात्र, असे असतानाही चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आता चीनने आपल्या 1.4 अब्ज लोकांना सांगितले आहे की,  गंभीर लक्षणे असलेल्या लोकांनी घरातच राहावे आणि सौम्य लक्षणांसाठी स्वत: ची काळजी घ्यावी

डिसेंबर रोजी चीनच्या कोविड धोरणांमध्ये बदल झाल्यापासून बीजिंगने अद्याप कोविड-19 मृत्यूची नोंद केलेली नाही. परंतु चीनमध्ये कोविड मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढत असलेली दिसत आहे. यूएस-आधारित इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHME) च्या नवीन अंदाजानुसार, चीनच्या कठोर COVID-19 निर्बंधांमुळे देशात कोरोनाव्हायरस संसर्गाचा स्फोट होऊ शकतो आणि 2023 पर्यंत 1 लाखांहून अधिक मृत्यू होऊ शकतात. अंदाजानुसार, 1 एप्रिलच्या आसपास चीनमध्ये कोविड-19 संसर्गाची प्रकरणे शिगेला पोहोचतील, जेव्हा मृत्यू 322,000 पर्यंत पोहोचतील. (हेही वाचा: जन्मदर सुधारण्यासाठी जपान सरकार नागरिकांना देणार ₹ 48,000 अनुदान)

दुसरीकडे, कोविड-19 चा चीनमधील स्मशानभूमी कामगारांवरही गंभीर परिणाम झाला आहे. इथले अनेक कामगार पॉझिटिव्ह आढळले आहेत. एका कर्मचाऱ्याने सांगितले की, एका मृतदेहाला अंतिम संस्कारासाठी तीन दिवस वाट पाहावी लागली. चीनच्या आरोग्य प्राधिकरणाने या महिन्यात 3 डिसेंबर रोजी कोविड-19 मुळे झालेल्या मृत्यूची शेवटची पुष्टी केली होती. चीनच्या राजधानीत 23 नोव्हेंबर रोजी शेवटचा मृत्यू झाला होता.