Coronavirus Outbreak: अमेरिकेत गेल्या 24 तासांत 2000 पेक्षा अधिक कोरोना बाधित नागरिकांचा मृत्यू; एका दिवसात सर्वाधिक मृतांची नोंद झालेला अमेरिका ठरला पहिला देश
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

चीन (China) देशाच्या वुहान (Wuhan) शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) आता संपूर्ण जगाला जेरीस आणले आहे. इटली (Italy), स्पेन (Spain) पाठोपाठ आता अमेरिकेत कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. दिवसागणित कोरोनाच्या बळींची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकत तब्बल 2108 नागरिकांचा मृत्यू झाला. एका दिवसात 2000 नागरिकांचा मृत्यूंची नोंद झालेला अमेरिका हा पहिला देश असल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या (Johns Hopkins University) माहितीनुसार एएफपी न्युज एजेंसीने (AFP News Agency) दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी अमेरिकत 2000 किंवा त्याहून अधिक कोरोना बाधित नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत अमेरिकत तब्बल 17925 नागरिकांना कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या 475,749 इतकी झाली आहे. (अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1,783 कोरोना बाधितांचा मृत्यू; देशातील मृतांचा आकडा 16000 वर)

ANI Tweet:

जगभरातील तब्बल 181 देशांमध्ये कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. जगभरात तब्बल 1,650,210 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात स्पेनमध्ये 157,053, इटली मध्ये 147,577 आणि जर्मनीत 119,624 नागरिक कोरोना बाधित आहेत. या पाठोपाठ फ्रान्स मध्ये 118,790, चीन मध्ये  82,941 आणि युके मध्ये  71,078 कोरोनाचे रुग्ण आहेत.

कोरोनाचा प्रभाव भारत देशातही वाढताना पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 6761 वर पोहचला असून 516 रुग्ण यातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 206 कोरोनाग्रस्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.