Coronavirus | (Photo Credits: AFP)

कोरोना विषाणू (Corona Virus) चीननंतर (China) आता युरोप आणि मध्य पूर्व देशांमध्ये विनाश घडवून आणत आहे. या विषाणूमुळे इटलीमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मृत्यूंची संख्या थांबायचे नाव घेत नाही. इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे एका दिवसात 349 मृत्यू झाले आहेत, तर देशात मृत्यूची संख्या दोन हजारांच्या पुढे गेली आहे. भारतही यातून वाचू शकला नाही. आता पाकिस्तानमध्ये (Pakistan) गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 131 वरून 186 पर्यंत वाढली आहे. पाकिस्तानच्या सिंध आणि खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील प्रांताधिकार्‍यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली.

या दोन्ही ठिकाणी कोरोना व्हायरसच्या अनुक्रमे 115 आणि 15 नवीन घटनांची पुष्टी करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील एकूण पुष्टी झालेल्या प्रकरणांची संख्या आता 186 झाली आहे. कोरोना व्हायरसच्या बाबतीत एका दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. ही वाढ मुख्यत्वे अलीकडेच तफ्तान सीमेवरुन आलेल्या एका यात्रेकरूंच्या जत्थ्यामुळे झाली असल्याची माहिती, सिंधच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार मुर्तजा वहाब यांनी एका ट्विटद्मवारे दिली. (हेही वाचा: COVID-19: कोरोना व्हायरस मुळे अमेरिकेत आणीबाणी; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा)

कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटना पाहता, पंजाब प्रांताने त्वरीत तयारी करत सर्व सार्वजनिक विद्यापीठे व वसतिगृहे आयसोलेशन केंद्रामध्ये रूपांतरित केली आहेत. कोरोना विषाणूमुळे पाकिस्तानमधील सर्व शैक्षणिक संस्था 5 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, इटलीमध्ये एका वृत्तपत्राने तबल 10 पानांवर शोक संदेश प्रसिद्ध केले आहेत, यावरूनच तिथल्या कोरोना साथीच्या आजाराच्या वेगवान प्रसाराचा अंदाज लावता येऊ शकतो. भारतात सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. नुकतेच एका तीन वर्षाच्या मुलीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे, अशाप्रकारे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 39 वर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मॉल्स, जिम्स, जलतरण तलाव इ. गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. नुकतेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विद्यापीठांच्या, महाविद्यालयांच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.