कोरोना विषाणूच्या (Coronavirus) लढाईमध्ये पहिल्यापासूनच न्यूझीलंडने (New Zealand) अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. न्युझीलंड हा कोरोनामुक्त होणारा पहिला देश ठरला होता. मात्र आता तब्बल 102 दिवसांनंतर देशात कोरोना व्हायरसच्या आजाराची काही प्रकरणे समोर आली आहेत. देशातील सर्वात मोठे शहर ऑकलंड (Auckland) मध्ये कोरोनाची चार नवीन प्रकरणे उघडकीस आल्यानंतर, शहर पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. न्यूझीलंडमध्ये, गेल्या 102 दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. याशिवाय पॅसिफिक बेटातील देशांमध्ये कोरोना विषाणूची 5 दशलक्ष प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि जागतिक स्तरावर त्यात सातत्याने वाढ होत आहे.
न्यूझीलंड हा संपूर्ण जगात कोरोना विषाणूच्या बाबतीत सर्वात सुरक्षित देश मानला जातो. मात्र आता आरोग्य विभागाचे संचालक एशले ब्लूमफिल्ड म्हणाले की, दक्षिण ऑकलंडमधील एका कुटुंबात कोरोनाव्हायरस-पॉझिटिव्ह रूग्णांची पुष्टी झाली आहे. यापैकी एक रुग्ण 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे. या चौघांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास नाही. कुटुंबातील सदस्यांची चाचणी घेण्यात आली असून ते या विषाणूचे बळी कसे ठरले याचा शोध घेतला जात आहे. या बातमीनंतर संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार शहर बंद होण्या दरम्यान अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सुपरमार्केटमध्ये गर्दी उसळली होती. (हेही वाचा: Coronavirus Vaccine बनवल्याचा रशियाचा दावा, राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या मुलीसाठी झाला पहिल्यांदा वापर)
याबाबत न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्र्डन म्हणाल्या की, ऑकलंडमध्ये बुधवारी दुपारपासून तीन टप्प्यावर बंदी घातली जाईल आणि सर्व बचाव उपाय सुरू केले जातील. या बंदीचा अर्थ असा होता की, लोकांना कार्यालये आणि शाळांपासून दूर ठेवले जाईल. कोठेही गर्दी जमा होऊ दिली जाणार नाही. 10 पेक्षा जास्त लोक एकत्रित करण्यास मनाई असेल. जसिंडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बंदी शुक्रवारपर्यंत तीन दिवसांसाठी लागू केली जाईल. तीन दिवसांची ही वेळ परिस्थितीचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी पुरेशी असणार आहे.